नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांचा सवाल
पुणे : नेहरू हे आता इतिहास आहेत. त्यांच्याविषयी अपुर्या, चुकीच्या व खोट्या माहितीच्या आधारे इतिहासाला डागाळण्याचे काम केले जाते. मात्र नेहरू देशप्रेमी, मानवप्रेमी, लोकशाहीला मानणारे पंतप्रधान होते. त्यांनीच देशाला विज्ञाननिष्ठ दृष्टी दिली. त्यांनी चुका केल्या नाहीत असे मी म्हणणार नाही. मात्र चुका नेहरूंनीच केल्या असा त्याचा अर्थ होत नाही. जो पुढाकार घेऊन काम करतो. त्यांच्या हातूनच चुका होतात. अशा शब्दांत नेहरूंवर टीका करणार्यांना ज्येष्ठ अभ्यासक व नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांनी उत्तर दिले.
गोखले राज्यशास्त्र संस्था व पुणे संवादतर्फे ‘नेहरू विचार मंथन’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी चपळगावकर बोलत होते. या वेळी लेखक राज कुलकर्णी, अर्थतज्ज्ञ डॉ. विजय कुलकर्णी, अजित रानडे आदी उपस्थित होते.
चपळगावकर म्हणाले, ‘भारत विज्ञाननिष्ठ निर्माण व्हावा, असे नेहरूंना वाटत होते. मात्र नेहरूंचा देशहिताचा दृष्टिकोन बाजूला सारून केवळ त्यांच्या चुकांची यादी तयार केली जाते. चुका या सर्व पंतप्रधानांकडून होतात. नुकतेच स्वातंत्र्य मिळालेले असल्याने त्या परिस्थितीत नेहरूंनी देश चालविला. देशाची सक्षम पायाभरणी केली. नेहरू हे देशाला नव्हे, तर जगाला ओळख असणारे नेते होते.’ नेहरूंनी ज्या ज्या वेळी देशवासीयांशी संवाद साधला तो संवाद आत्मसंवाद असायचा. त्यामुळे ते प्रचंड लोकप्रिय होते. नेहरूंवर गांधीजींचा प्रभाव होता, असेही चपळगावकर यांनी नमूद केले.
वल्लभभाई पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी नेहरूंवर जे आरोप केले ते साफ खोटे आहेत. नेहरूंचे महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस यांच्याशी मैत्री व आदराचे संबंध होते. चीन आणि काश्मीर संदर्भातही नेहरूंवर आरोप केले जातात. मात्र त्या त्या परिस्थितीत नेहरू यांनी केवळ देशहिताचेच निर्णय घेतले आणि ते गरजेचे होते. नेहरूंविषयी गैरसमज पसरविले जातात. मात्र इतिहास जाणून घेणार्यांनी सजग राहिले पाहिजे, असेही नरेंद्र चपळगावकर यांनी स्पष्ट केले. डॉ. विजय केळकर, अजित रानडे यांनी मनोगत व्यक्त केले. भाषा संस्थेच्या अध्यक्षा स्वाती राजे यांनी सूत्रसंचालन केले.
नेहरूंमुळेच लोकशाही टिकून
जगात भारताची ओळख नेहरू, गांधींचा देश अशी आहे. नेहरूंनी हा देश घडविला. अद्यापही नेहरू देशाला दिशादर्शनाचे कार्य करत आहेत. प्रत्येक भारतीयाच्या मनात नेहरू आहेत. नेहरूंच्या पश्चात त्यांच्यावर आरोप केले जातात, असे नाही. ते हयात असतानाही त्यांच्यावर आरोप झालेच आहेत. मात्र नेहरूंच्या मजबूत पायाभरणीमुळे जगातील सर्वांत मोठी लोकशाही भारतात टिकून असल्याचे लेखक राज कुलकर्णी यांनी सांगितले.