हैदराबाद : ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते आणि तेलगु सुपरस्टार कृष्णा यांचे मंगळवारी येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. महानायक महेश बाबू यांचे ते वडील आणि मराठी अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांचे सासरे होते.

कृष्णा यांना सोमवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून ते कृत्रिम श्वासोच्छश्वासावर होते. नंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

घटामनेनी शिवराम कृष्णा, असे त्यांचे पूर्ण नाव होेते. गुंटूर जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला होता. तेलगु चित्रपटसृष्टीत १९६० मध्ये त्यांनी पदार्पण केले. त्यानंतर ते कृष्णा या नावाने प्रसिद्ध झाले होते. थेने मानासुलू आणि साक्षी चित्रपटात प्रमुख अभिनेता म्हणून त्यांनी संधी मिळाली.त्यांनी सुमारे 350 चित्रपटांत अभिनय केला. रुबाबदार आणि धाडसी व्यक्‍तिमत्त्व, अशी त्यांची ख्याती होती. मोसागल्लाकू मोसागाडू या काउबॉयच्या भूमिकेतील चित्रपटाला रसिकांनी डोक्यावर घेतले. तेलगू चित्रपटसृष्टीतील जेम्स बाँड म्हणून त्यांनी ख्याती मिळवली. त्यांचे हेरगिरीचे कथानक असलेला गुडाचारी 116, एजंट गोपी, रहस्य गुडाचारी आणि गुडाचारी ११६ हे चित्रपट गाजले. तब्बल पाच दशके त्यांनी अभिनय, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून कार्य केले. त्यांना २००९ मध्ये पद्मभूषणने गौरविण्यात आले.

इलुरी मतदारसंघातून ते १९८९ मध्ये खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांचे जावई जयदेव गाला हे सध्या गुंटूर येथून तेलगु देशम पक्षाचे खासदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, आंध्रचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, अभिनेता चिरंजीवी यांनी दु:ख व्यक्‍त केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा