मिनाक्षी कुलकर्णी

आज 14 नोव्हेंबर, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन. अर्थात, बालदिन, त्यानिमित्ताने…

आज बालके अनेक तणावांचा सामना करताना दिसतात. स्पर्धेच्या जगात आपल्या मुलानं टिकावं, खंबीरपणे उभं रहावं, असं पालकांना वाटणं सहाजिक असतं आणि त्यासाठी शिक्षण हा राजमार्ग आहे. आपलं मूल मोठेपणी सदाचरणी, आदर्श नागरिक व्हावं असं वाटत असेल तर लहानपणापासूनच बाळकडू द्यायला हवं. त्या दृष्टीने बालदिन हा बालकांच्या मानसिक मशागतीची खूणगाठ बांधायला लावणारा दिवस ठरावा.

मुलांमध्ये रमणार्‍या, त्यांचं कोमल मन उमगू शकणार्‍या ‘चाचा नेहरूं’चं स्मरण करताना, आज मुलांचे प्रश्‍न कसे आणि किती जटील आहेत, याचाही विचार व्हायला हवा. एकीकडे आपण ‘बालक’ म्हणून उल्लेख करतो तेच बालक आज अनेक प्रकारच्या तणावाचा सामना करताना दिसतात. त्यांच्या बालपणावर विविध गोष्टींचं आक्रमण होताना दिसते. सजग पालक म्हणून त्यांच्या समस्यांची नोंद घेणं गरजेचं आहे.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे मुलांनाही तणावाचे चटके सहन करावे लागतात. शाळेचं दडपण, अभ्यासाचा ताण, घरची परिस्थिती ही मुलांवरील तणावाची काही कारणं बनत आहेत. सर्वांगीण विकासासाठी थोडा ताण चांगला असला तरी जास्त ताणामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. जास्त ताणामुळे त्यांच्या शारीरिक, मानसिक स्वास्थ्य आणि मनःस्थितीवरही परिणाम होतो.

सर्वप्रथम मुलांमध्ये तणावाची लक्षणे आणि त्यामागील कारणांचा विचार करायला हवा. शरीरात अ‍ॅड्रेनलाईन आणि कोर्टिसोल नावाचे हार्मोन्स तयार होतात तेव्हा तणाव उत्पन्न होतो. या हार्मोनच्या उत्सर्जनामुळे मुलांच्या मनावर आणि शरीरावर अनेक परिणाम होतात. उदाहरणार्थ, जलद श्‍वास, हृदयाचे जलद ठोके, डोकेदुखी, चक्कर येणं, झोप न लागणं, मळमळ, अपचन आणि पचन समस्या, वजन वाढणं किंवा कमी होणं, वेदना, गंभीर आजार आदींची शक्यता वाढते. शिवाय अन्य काही कारणांमुळेही मुलांमध्ये भावनिक आणि मानसिक ताण दिसू शकतात. चिडचिड, राग अनावर होणं, मित्रांपासून दूर राहणं, जबाबदार्‍यांकडे दुर्लक्ष, कोणत्याही कामात लक्ष केंद्रित न होणं यासारख्या लक्षणांवरुन ताण ओळखता येतो. मुलांशी प्रेमाने वागून, त्यांच्या समस्या समजून मार्ग काढण्यास मदत करत तणावापासून मुक्ती मिळवून देता येऊ शकते. यासाठी प्रत्येक दांपत्याने आपलं मूल तणावाखाली का आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. यामुळेच त्यांना तणावमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू होतील. मुलांना वेळ आणि प्रेम द्यायला हवं. घरातली वागणूक, विचार आणि भावनांचा मुलावर परिणाम होऊ शकतो. मुलांसाठी पालक हे आदर्श असतात. म्हणूनच त्यांना तणावमुक्त करण्यासाठी त्यांच्याशी वेगवेगळे अनुभव शेअर करता येतील.

पूर्वी मुलांना वाढवणे खरंच खूप सोपे होते. समाजामध्ये कौटुंबिक वातावरण होतं. प्रत्येक घरात किमान तीन-चार भावंडे असायची. मोठ्या मुलाला थोडं-फार धाकात ठेवलं की काम भागत असे. मुलं मुळात अनुकरणप्रिय असल्यामुळे धाकटं भावंड मोठ्या भावंडाची शिस्त आणि संस्कार याचं पालन करत असे. मुलात मूल आनंदाने वाढायचं. आपल्याला मिळालेली वस्तू किंवा खाऊ सगळ्या भावंडांमध्ये मिळून वाटून घ्यायची. तडजोडीची वृत्ती अंगात आपोआपच भिनायची. संस्काराचं हे बीज आपोआपच रुजत होतं. त्यासाठी आई-वडीलांना वेगळा वेळ द्यावा लागत नव्हता. मुख्य म्हणजे टिव्ही किंवा मोबाईलसारख्या चैनीच्या वस्तू उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे मुलांना त्यांची सवय लागण्याचा प्रश्‍नच उद्भवत नव्हता. मनोरंजनासाठी मुले मैदानावर आपोआपच खेळायला जायची, गोष्टींची पुस्तके वाचायची. त्यामुळे बौद्धिक आणि शारीरिक व्यायाम याबद्दल आई-वडील निश्‍चिंत असायचे. आईच्या मायेच्या नजरेखाली आणि आजी-आजोबांच्या उबदार कुशीत, सुरक्षित वातावरणात मुलांचे मानसिक आरोग्य उत्तम जपले जात होते; पण आज एकूण सामाजिक, आर्थिक परिस्थिती खूप बदलली आहे. त्यामुळे कुटुंबाची घडीही वेगळी झाली, महागाई वाढली तसंच मुलांची संख्याही कमी झाली.

आता घरातल्या स्त्रियांना अर्थार्जनासाठी बाहेर पडावंच लागतं हीदेखील वस्तुस्थिती आहे. यामुळे कुटुंबाचं राहणीमान उंचावलं. सगळ्याच मनोरंजनाच्या आणि सुखचैनीच्या वस्तू मुलांना सहज मिळू लागल्या. कारण ही काळाची गरज झाली आहे. अशा वेळी मुलांना या वस्तू उपलब्ध करून देतानाच त्याच्या आहारी न जाण्याची समज मुलांमध्ये आणणं हे पालकांसाठी तारेवरच्या कसरतीसारखं अवघड काम होऊन बसलं आहे. त्याच वेळी बाहेरच्या खर्‍या जगातला आनंद घेण्याची गोडी लावणं, हाच मुलांना वाचवण्याचा रामबाण उपाय आहे. या बाहेरच्या जगातल्या आनंदामध्ये मैदानं, वेगवेगळे खेळ, त्यातली मजा अनुभवायला देत बुद्धिबळासारखे अधिक चालना देणारे खेळ खेळणं, एखाद्या कलेची आवड जोपासून नवनिर्मितीचा आनंद घ्यायला शिकवणं या गोष्टी करता येतील. कलेमध्ये गायन, वादन, नृत्य, वाद्यवादन; इतकंच काय पण हस्तकलेचे विषयसुद्धा मुलांना आवडू शकतात. एकदा या नवनिर्मितीच्या आनंदाची गोडी कळली की ते मोबाईलसारख्या खोट्या, आभासी जगापासून आपोआपच दूर राहतील.

आजचं जग स्पर्धेचं आहे. त्यात आपल्या मुलानं टिकावं, मोठेपणी खंबीरपणे उभं रहावं, असं पालकांना वाटणं सहाजिक असतं आणि त्यासाठी शिक्षण हा राजमार्ग आहे हे ही सर्वज्ञात आहे. त्यासाठी पालक हर प्रकारे प्रयत्नही करत असतात. पण काही वेळा असं दिसतं की पालक मुलांवर आपल्या मनातल्या अपेक्षांचं ओझं लादत असतात. तू डॉक्टर हो, वकील हो किंवा अमुक कुणी हो असं सांगत प्रसंगी आपल्या प्रेमाचाही सौदा करतात. अशा वेळी बालकदेखील आई-वडिलांच्या प्रेमापोटी त्यांच्या इच्छेच्या इतक्या आहारी जातं की आपल्याला काय पाहिजे हेच विसरून जातं. यांना हवं ते बनवून दाखवण्यासाठी ते लढायला सज्ज होतं. दुर्दैवानं तेवढी बौद्धिक क्षमता नसेल तर त्याला अपयश येतं, त्याचा आत्मविश्‍वास जातो आणि प्रसंगी ती नैराश्याचे बळीही ठरु शकतात. एकंदरीत, अपत्याची बौद्धिक क्षमता समजून घेण्याला तसंच त्यांना प्रेमानं स्वीकारण्याला खरं पालकत्व म्हणता येईल. पंडीत जवाहरलाल नेहरू म्हणत की मुलं ही राष्ट्राची संपत्ती आहे, ते देशाचे उद्याचे आधारस्तंभ आहेत. म्हणूनच त्यांना अत्यंत सुरक्षितपणे, प्रेमभावनेनं वाढवायला हवं. यातला सुरक्षितपणा म्हणजेच मुलांना आत्मविश्‍वास देणं हा भाव अभिप्रेत असावा.

बालजगतात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. ही गोष्ट चिंतेची तर आहेच पण त्यामुळे हेच दिसतं की या बालकांची चित्तं अशांत आहेत. असुरक्षिततेच्या भावनेने त्यांना ग्रासलं आहे. त्यामध्ये सर्व वर्गातली मुलं आहेत. याचा अर्थच असा की त्यांच्यावर संस्कार करायला आपण कमी पडत आहोत. मूल सांभाळणं हे अतिशय कौशल्याचं, काळजीपूर्वक लक्ष घालण्याचं काम आहे. आपलं मूल मोठेपणी सदाचरणी, समाजाभिमुख, आदर्श नागरिक व्हावं असं वाटत असेल तर त्याचं बाळकडू लहानपणापासूनच द्यायला हवं. मुलांवरील संस्कारांची सुरुवात ही पहिल्यांदा घरातूनच होते. घरातच परस्परांना मान देण्याचे, प्रेम करण्याचे, अतिथीचा सन्मान करण्याचे संस्कार होत असतील तर ते मूल आपोआपच संवेदनशील आणि विनम्र वृत्तीचं घडत जातं.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा