राजीव यांची हत्या होणार हे या सर्वांना माहीत होते. तो कट पूर्णत्वास नेण्यात त्यांचा सहभाग होता हे महत्त्वाचे आहे. अशांना अमेरिकेत शेकडो वर्षे कैदेची शिक्षा दिली जाते. त्यांची सुटका झाल्याने धोकादायक प्रथा पडू शकते.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करण्याच्या कटात गुंतलेल्या सहा गुन्हेगारांची सर्वोच्च न्यायालयाने सुटका केली आहे. हा निकाल योग्य आहे की नाही यावर सामान्य माणूस टिप्पणी करू शकत नाही. कारण न्यायमूर्तींनी या प्रकरणाचा व संबंधित कायद्यांच्या निश्‍चितच बारकाईने अभ्यास केलेला असणार. गेल्या मे महिन्यात या प्रकरणातील आणखी एक गुन्हेगार ए.जी पेरारिवलन याची न्यायालयाने सुटका केली होती.त्याच आदेशाच्या आधारे अन्य सहा जणांची सुटका करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. घटनेच्या 142 व्या कलमाने सर्वोच्च न्यायालयास दिलेल्या विशेष अधिकाराच्या अंतर्गत न्यायालयाने सुटकेचा आदेश दिला आहे.’ जे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर आहे त्यात पूर्ण न्याय व्हावा यासाठी आवश्यक तो आदेश अथवा निवाडा सर्वोच्च न्यायालय देऊ शकते’ असा या कलमाचा ढोबळमानाने अर्थ आहे. यात निर्णयाचे स्वातंत्र्य-डिस्क्रीशन- सर्वोच्च न्यायालयाकडे दिले आहे. त्याचा वापर कधी, कसा करावा याचे अधिकार न्यायालयाकडे आहेत. सर्व गुन्हेगारांनी तीस वर्षांपेक्षा अधिक काळ तुरुंगवास भोगला आहे, त्यांचे वर्तन चांगले आहे या आधारे त्यांची सुटका करण्यात आली आहे.या निर्णयावर काँग्रेसने तीव्र निषेधात्मक प्रतिक्रिया दिली आहे तर द्रमुकने त्याचे स्वागत केले आहे.

नियोजनबद्ध कट

खटला सुरु असेपर्यंत त्या व्यक्तीस आरोपी (अ‍ॅक्युज्ड) म्हटले जाते. आरोप सिद्ध झाल्यावर ती व्यक्ती गुन्हेगार (कन्व्हिक्ट) ठरते. आता सुटका करण्यात आलेले सर्वजण गुन्हेगार ठरले होते, कारण त्यांच्यावरील गुन्हे शाबित झाले होते. निवडणुकीच्या प्रचारसभेच्या काळात 21 मे 1991 रोजी सायंकाळी राजीव गांधी यांची मानवी बॉम्बने हत्या करण्यात आली होती. त्यांचा देह छिन्न विच्छिन्न झाला होता. त्याचे मूळ श्रीलंकेतील सिंहली व तामिळ यांच्यातील वांशिक संघर्षात आहे. श्रीलंकेत स्वतंत्र तामिळ राज्याची मागणी करणारे अनेक गट होते. त्यापैकी ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलम’ ही सर्वात आक्रमक अतिरेकी संघटना होती. श्रीलंकेच्या अनेक नेत्यांची हत्या तिने केली होती. तामिळ अतिरेक्यांचा बीमोड करण्यासाठी श्रीलंकेने तेव्हा भारताकडे मदत मागितली. भारताने पाठवलेल्या जवानांना ’शांतता सेना’ म्हटले गेले. त्यामुळे ‘टायगर्स’चा नेता प्रभाकरन संतापला व त्याने राजीव यांच्या हत्येची योजना आखली. आता सुटका करण्यात आलेले नलिनी श्रीहरन, टी. सुथेंद्रराजा ऊर्फ संथन, व्ही. श्रीहरन ऊर्फ मुरुगन, रॉबर्ट पायस, जयकुमार व रविचंद्रन ऊर्फ रवी या सर्वांनी हत्येचा कट आखण्यात व त्यास मूर्त रूप देण्यात कशी भूमिका बजावली याचे तपशील तेव्हाच्या वृत्तपत्रांनी व इतर नियतकलिकांनी प्रसिद्ध केले होते. या सर्वांनी गुन्हा कबूलही केला होता. प्रत्यक्ष हत्येपूर्वी नेत्यापर्यंत पोहोचण्याची ‘रंगीत तालीम’ही धनु व नलिनी यांनी केली होती. शिवरासन हा या कटाचा सूत्रधार होता. हत्येनंतर तो नलिनीसह पळून गेला. निष्णात गुप्तचर अधिकारी डी. आर. कार्तिकेयन व त्यांच्या सहकार्‍यांनी संगणक व अन्य आधुनिक उपकरणांची साथ नसताना कमी वेळेत या कटाचा छडा लावला हे महत्त्वाचे आहे. विशेष पथक पोहोचेपर्यंत काही आरोपींनी आत्महत्या केली होती इतके या पथकाचे कार्य अचूक होते; पण तेव्हाही वांशिक मुद्दा आड आला. तामिळ अतिरेक्यांना तामिळनाडूच्या राजकीय पक्षांची सहानुभूती होती. आताही मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी या निर्णयाचे स्वागत केले त्यावरून ते दिसते. अटक झाली तेव्हा नलिनी गरोदर होती म्हणून सोनिया गांधी यांनी दयाबुद्धीने तिला फाशी न देण्यास सुचवले होते. गुन्हेगारांना फासावर लटकवल्याने मृत व्यक्ती परत येत नाही, हे खरे असले तरी हे सूत्र वापरल्यास खुनाच्या कोणत्याही प्रकरणात गुन्हेगारास शिक्षा देता येणार नाही. या सर्व गुन्हेगारांचे तुरुंगातील वर्तन चांगले होते. कारण त्यांचे अन्य कोणाशी भांडण नव्हते. राजीव गांधी यांना ‘संपवणे’ एवढेच त्यांचे उद्दिष्ट होते. त्यात ते सफल झाले. त्यांचा या कटात सहभाग किती हा तपशील गौण आहे. एका सर्वभौम देशाच्या माजी पंतप्रधानाची ज्यांनी हत्या केली ते कायद्याच्या आधारे सुटले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा