नांदेड : काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’त गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सहभागी झाले. शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड काल पदयात्रेत सहभागी झाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काढण्यात आली आहे. सध्या ही यात्रा नांदेडमध्ये आहे. या यात्रेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सहभागी झाले.
या पदयात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सहभागी होणार होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते यात्रेत सहभागी होणार नाहीत, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिली. शिवसेना नेते आणि माजी राज्यमंत्री आदित्य ठाकरे आज (शुक्रवारी) यात्रेत सामील होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
काल देगलूर नाका येथून पदयात्रा निघाली. त्यानंतर, सायंकाळी जाहीर सभा झाली.
या सभेत राहुल यांनी भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. नोटाबंदी, जीएसटी आदी चुकीच्या धोरणावर टीका केली. नोटाबंदीची घोषणा करताना काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले होते. मात्र, यात मोदी सरकारला अपयश आले. मध्यंतरी, पंतप्रधानांनी अश्रू ढाळले; पण या निर्णयाने काहीच साध्य झाले नाही. उलट, शेतकर्यांच्या समस्या वाढल्या. वस्तू आणि सेवा कर आणत सरकारने शेतमालावर जीएसटी लावला. आता जीवनावश्यक वस्तूंवरही जीएसटी लादला आहे. त्यामुळे सामान्यांचे जगणे असह्य झाले आहे, असेही राहुल म्हणाले.