कायदेशीर सल्ला : अ‍ॅड. विलास सूर्यकांत अत्रे
9850978450
अ‍ॅड. गीता अत्रे-कौजलगीकर
9822842692

प्रश्‍न – माझे वडील नुकतेच मयत झालेले आहेत. त्यांना मी, माझा भाऊ व एक बहीण असे वारस आहोत. माझ्या वडिलांनी बेकायदेशीरपणे दुसरे लग्न केले होते. त्यापासून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहेत. हे माझे सावत्र बहीण व भाऊ वडिलांच्या मिळकतीत हक्क मागत आहेत. काय करावे?

उत्तर – तुमच्या प्रश्‍नातच निम्मे उत्तर सामावलेले आहे. तुम्ही तुमच्या वडिलांचे अपत्य आहात तसेच ज्यांना तुम्ही सावत्र भाऊ म्हणता तेही तुमच्या वडिलांची अपत्ये आहेत. तुमच्या दृष्टीने ती सावत्र भावंड आहेत. वास्तव असे आहे की तुमच्या वडिलांनी जशी त्यांची मिळकत मागे ठेवली आहे तसेच त्या मिळकतीवर हक्क सांगणार्‍या व्यक्तीही मागे ठेवल्या आहेत. तुमच्या दृष्टीने ती तुमची सावत्र भावंडे आहेत. थोडे सावत्र भावंडांच्या चष्म्यातून पाहिले तर तुम्ही त्यांची सावत्र भावंडे आहात. तर्कसंगत विचार करायचा झाला तर ज्याने मिळकत मागे ठेवलेली आहे त्याच्या दृष्टिकोनातून या गोष्टीचा विचार करायला हवा. तुमच्या वडिलांच्या दृष्टिकोनातून विचार करताना एका स्त्रीपासून झालेल्या मुलांमध्ये जसा फरक करता येत नाही तसाच त्या पुरुषाला एका पेक्षा अधिक स्त्रियांकडून झालेल्या मुलांमध्ये फरक करता येत नाही. त्या पुरुषाची नंतर झालेली लग्ने किंवा अन्य स्त्रियांशी आलेले संबंध हे अनैतिक असले तरी त्यातून निर्माण झालेली संतती ही त्या पुरुषाचीच असते. एखाद्या पुरुषाचे एखाद्या स्त्रीशी आलले संबंध हे कायदेशीर आहेत किंवा बेकायदेशीर आहेत हे कायदा सांगतो पण अशा व्यक्तीला अधिक स्त्रियांपासून झालेली संतती ही बेकायदेशीर आहे असे म्हणणे तर्कसंगत होत नाही. अशा तर्‍हेच्या वादांमध्ये उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालये यात अनेक प्रकरणे झाली असून त्यावरून निर्णयही दिलेले आहेत. माझ्या वाचनात एक निर्णय आला त्याप्रमाणे न्यायालयाने असे म्हटले आहे की दुसरे लग्न अवैध असले तरी दुसर्‍या पत्नीला झालेल्या अपत्याला वडिलांच्या वारस हक्कावर अधिकार मिळायला हवा. हा निर्णय देताना तर्कसंगतीचा विचार कोर्टाने केला असावा असे वाटते पण या पलीकडेही जाऊन हिंदू वारसा कायद्याशिवाय हिंदू विवाह कायदा कलम 16 चा विचार करणे जरुरीचे आहे. या कलमाप्रमाणे हिंदू स्त्री व पुरुष यांचे लग्न मूलतः बेकायदेशीर असेल किंवा ते बेकायदेशीर ठरू शकते असे असते. अशा वेळी त्या स्त्री पुरुषांच्या कायद्यातील नात्याचा विचार न करता या विवाहापासून त्यांना झालेली संतती ही त्या पुरुषाची कायदेशीर संतती समजली गेली आहे. थोडक्यात हिंदू वारसा कायद्याचा विचार करताना नुसती तर्कसंगत गोष्ट विचारात घेण्यापेक्षाही हिंदूविवाह कायद्याचा विचार केला तर एखाद्या पुरुषाला झालेले अपत्य कायदेशीर पत्नी पासून असो किंवा कायद्याने तिला पत्नी म्हणून दर्जा दिलेला नसला तरी ती सर्व अपत्ये ही त्या व्यक्तीच्या मिळकतीचा हिस्सेदार होताना हिंदू विवाह कायद्याने त्यांना समान दर्जा दिलेला आहे. त्यामुळे तुमच्या सावत्र भाऊ बहिणींना तुमच्या वडिलांच्या मिळकतीत तुमच्याप्रमाणेच हिस्सा असून, हा वाद सामोपचाराने मिटवणे हा योग्य मार्ग राहील.

दि. 4 नोव्हेंबर 2022 च्या दैनिक केसरीमध्ये हिंदू वारसाकायदा उणिवा आणि मार्ग हा लेख प्रसिद्ध झाला आहे. प्रसिद्ध होताना त्यातील फक्त उणिवा प्रसिद्ध झालेल्या असून, जागे अभावी अशा उणिवांवर मात करणारा मार्ग यावरचा मजकूर प्रसिद्ध व्हावयाचा राहिलेला आहे म्हणून प्रथम तो विषय संपवून आज विचारलेल्या शंकेचे समाधान करतो. मागील लेखात एखादा हिंदू पुरुष मयत झाल्यानंतर त्याच्या वारसांमध्ये मुले, मुली, पत्नी, मयत मुलामुलींच्या मुलामुलींसह त्याची आईपण येते. असा हिंदू पुरुष मयत झाल्यानंतर त्याच्या आईला मिळणारी संपत्ती ही तिची स्वतःची होते. ही स्त्री मयत झाल्यानंतर हिंदू वारसा कायद्यामध्ये मयत स्त्रीचे दिलेले वारस आणि त्यांना मिळणारा हिस्सा यातील तरतुदीप्रमाणे मयत स्त्रीची मुले, मुली, पती तसेच तिच्या मयत मुलामुलींची मुले यांच्याकडे वारसाने जातो. थोडक्यात एका मयत मुलाची आई म्हणून वारसाहक्काने मिळालेली मिळकत ही आईच्या पश्‍चात अशा मयत मुलाच्या भाऊ, बहीण, मयत भाऊबहीण त्यांची मुले, वडील यांना मिळते. तार्किकदृष्ट्या ती मिळकत फक्त ज्या मयत मुलामुळे त्याच्या आईला हा हिस्सा मिळालेला आहे तो मयत मुलाच्या मुलांना मिळणे जरुरीचे आहे. ही कायद्यातील उणीव भरून काढण्यासाठी या नाते संबंधात चांगले संबंध असतील तर मार्ग आहे. अन्यथा नाही. तो मार्ग म्हणजे हक्कसोड पत्राचा आहे. मुलगा मयत झाल्यानंतर त्याच्या आईकडे आलेला हिस्सा ती नोंदणीकृत हक्कसोड पत्राने मयत मुलाच्या वारसांच्या लाभात सोडून देऊ शकते. तसेच मयत मुलाचे भाऊ, बहीण, पुतणे, पुतण्या, वडील या व्यक्ती मयत मुलाच्या मिळकतीतील त्यांना मिळालेला हिस्सा हक्कसोड पत्रावरून मयत पुरुषाच्या वारसांच्या लाभात सोडू शकतात. मात्र तसे काही झाले नाही, तर मयत पुरुषाच्या वारसांना तार्किकदृष्ट्या मिळणार्‍या हिश्श्यावर पाणी सोडावे लागते आणि कोर्ट केसेस सुरू होऊ शकतात. कायद्यामध्ये हिंदू मयत पुरुषाच्या मिळकतीत त्याच्या आईला मिळणारा हिस्सा हा ती आई मयत झाल्यानंतर फक्त ज्या मयत मुलाच्या संपत्तीचा हा हिस्सा मिळालेला आहे त्याच्या वारसांना मिळण्याची तरतूद केली तर वर लिहिलेल्या उणिवांना कायम स्वरूपी कायदेशीर मार्ग निघू शकतो. याचा विचार होणे आवश्यक आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा