पुणे : मंगलाष्टकांचे सूर, राधे-कृष्ण गोपाल कृष्णचा जयघोष आणि श्रीकृष्ण-तुळशीवर झालेला अक्षदांचा वर्षाव अशा वातावरणात पेशवेकालीन तुळशीबाग राममंदिराच्या सभामंडपात तुळशी विवाह सोहळा थाटात पार पडला. श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन झाल्यानंतर विवाह सोहळ्याचा विधी उत्साहात पार पडला. यावेळी पुणेकरांनी पारंपरिक वेशात मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
श्रीरामजी संस्थान तुळशीबागच्यावतीने पेश्वेकालीन तुळशीबाग राम मंदिरात तुळशीविवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त श्रीपाद तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता.
सनईचे मंगल सूर निनादत असताना उपस्थित महिलांनी मंगलाष्टके म्हणत विवाह सोहळ्यात सहभाग घेतला. आकाशकंदील, फुलांच्या माळा आणि विविधरंगी लाईटस्नी मंदिराचा प्रांगण सजविण्यात आला होता. विवाह सोहळ्याला पारंपरिक वेशात लहान मुला-मुलींची उपस्थिती होती. विवाह सोहळ्यानंतर चिमुकल्यांनी श्रीकृष्ण-तुळशीला औक्षण केले. तुळशीविवाह सोहळ्याला मोठया संख्येने पुणेकर उपस्थित होते.
श्रीरामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने तुळशीबाग राम मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीचे मुक्त दर्शन घेण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. आज सोमवारी सकाळी 7 ते दुपारी 1 यावेळेत भाविकांना थेट गाभार्यात जाऊन श्रीराम, सीता व लक्ष्मणाच्या मूर्तीचे दर्शन घेता येईल. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.