आघाडीची वाट न बघता कामाला लागण्याचे अजित पवारांचे आदेश
मुंबई, (प्रतिनिधी) ः
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट युतीच्या विरोधात शक्य तिथे महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याबाबत चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी शिर्डीत आयोजित पक्षाच्या अधिवेशनात बोलताना येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीची वाट बघत बसू नका, निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश दिला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आलेले कार्यकर्तेच पक्षाला ताकद देतात. त्यातून आमदार, खासदार तयार होतात. हेच लोक लोकसभा, विधानसभा निवडणुकीची वाट सोपी करणारे आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्या विचारांची माणसे निवडून आणा. यासाठी पक्षाकडून निर्णय येईल याची वाट बघत बसू नका. निर्णय येईल तेव्हा येईल; तोपर्यंत स्वतंत्र लढायचे आहे. त्यादृष्टीने कामाला लागा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मोर्चेबांधणीचा एक भाग म्हणून राष्ट्रवादीने कालपासून शिर्डीत दोन दिवसांचे शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना पवार यांनी स्थानिक निवडणुकांचे रणशिंग फुंकले. स्थानिक निवडणुका लांबणीवर टाकण्यावरून पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. लोकशाही व्यवस्थेला नख लावण्याचे काम होत आहे. परंतु, ते कधीही यशस्वी होणार नाही. सर्व निवडणुका वेळेत होणे आवश्यक आहे. परंतु, निवडणुकांना विलंब लावला जात असून हे लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही. निवडणुका वेळेत व्हाव्यात यासाठी राज्य निवडणूक आयोगाने लक्ष दिले पाहिजे. त्यांची ती जबाबदारी आहे, असे अजित पवार म्हणाले.
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मोठे प्रकल्प बाहेर गेले आहेत. त्यातून लाखो नोकर्‍या तरुणांना गमवाव्या लागल्या आहेत. मात्र, सरकार याचे लंगडे समर्थन करताना दिसत आहे. चार लाख कोटी एवढी गुंतवणूक राज्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितले होते. मात्र, आता महाविकास आघाडीच्या काळात प्रकल्प गेला असे धांदात खोटे बोलत आहेत. अंगलट आल्यावर दिल्लीला जातो आणि प्रकल्प घेऊन येतो, असे ते सांगत आहेत. मात्र, यांच्यामुळेच बेकारी वाढत आहे. नोकर्‍यांवर गंडांतर येत आहे. हे सरकार जनतेची पूर्णपणे फसवणूक करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा