नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवरील बंदी आणखी एक वर्षाने वाढवली आहे. देशात साखरेचा साठा विपूल राहावा, या दृष्टीने पुढील वर्षी 31 ऑक्टोबरपर्यंत ही बंदी लागू असणार आहे.
केंद्र सरकारने यापूर्वी 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्याची मुदत आता आणखी एक वर्षे वाढवली आहे. त्यामध्ये कच्ची, शुद्ध आणि पांढर्या साखरेचा समावेश आहे. निर्यातबंदी ही पुढील आदेश येईपर्यत लागू राहणार आहे. याबाबतची निवेदन परदेशी व्यापारचे महासंचालकांनी प्रसिद्ध केले आहे. परंतुु या बंदीतून युरोप आणि अमेरिकेला वगळले असून सीएक्सएल आणि टीआरक्यू ड्युटी कन्सेशन कोटाअंतर्गत साखर निर्यात करता येणार आहे.
साखरेचे उत्पादन आणि निर्यातीत जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. यंदाही हा क्रमांक भारताने टिकवून ठेवला आहे. साखरेची निर्यात करण्यासाठी निर्यातदाराला सरकारचा परवाना आणि परवानगी घ्यावी लागते. यंदाच्या हंगामात 36. 5 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ते 2 टक्के अधिक आहे. 2021 ते 2022 या कालावधीत 35.8 दशलक्ष टन उत्पादन झाले होते.