मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार माघारीचा निर्णय घेण्याच्या विरोधात होते. राज यांनी पत्र लिहिले ते देवेंद्र फडणवीस यांना, मात्र माघारीच्या निर्णयाची घोषणा करण्यासाठी भाजपने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पुढे केले!

विधानसभेच्या अंधेरी पूर्व जागेसाठी होणार्‍या पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय केवळ औपचारिकता उरली आहे. जोरदार वातावरण निर्मिती करून अखेर पराभवच पदरी पाडून घ्यायचा की झाकली मूठ झाकलेलीच राहू द्यायची, हे पर्याय भारतीय जनता पक्षासमोर होते. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. मतदारांची सहानुभूती अर्थातच त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना आहे. याशिवाय उद्धव यांना अडचणीत आणण्याची एकही संधी शिंदे गट आणि भाजपकडून सोडली जात नसल्याने शिंदे गट आणि भाजप या दोघांबद्दल मतदारांमधून नकारात्मक प्रतिक्रिया उमटण्याचीच अधिक शक्यता होती. हे वास्तव ओळखून भाजपने आपले उमेदवार मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतली. मात्र, त्यासाठी राज ठाकरे यांचे पत्र, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आवाहन याचा आधार घेता – घेता भाजपची झाकली मूठ उघडी पडली! शिवसेनेत फूट पडल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय असंस्कृतीचे दर्शन घडले. एकनाथ शिंदे यांच्या गटाने पक्षावर, पक्षाच्या चिन्हावर दावा सांगितला. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असतानाच निवडणूक आयोगाने कार्यक्षमतेचे दर्शन घडवीत शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले.

लटकेंना सहानुभूती

शिवसेनेबद्दल कितीही मतमतांतरे असली तरी पक्षाचे नाव वापरण्यास उद्धव ठाकरे गटाला करण्यात आलेली मनाई, धनुष्यबाण चिन्ह गोठविण्याचा निर्णय याबद्दल महाराष्ट्राची प्रतिक्रिया नाराजीच असल्याचे दिसले. या पार्श्‍वभूमीवर उद्धव गटाला मिळालेल्या मशाल चिन्हाला मतदारांकडून कसे स्वीकारले जाते याची चाचणी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत होणार, हे निश्‍चित होते. पारडे उद्धव गटाच्या बाजूने झुकलेले दिसत असल्याने ऋतुजा लटके यांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखण्याचे प्रयत्न झाले. एक महिना आधी राजीनामा दिला, उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत आली तरी तो मंजूर केला गेला नाही. हे सारे महापालिकेच्या पातळीवर झाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा त्याच्याशी संबंध नव्हता, यावर कोणाचाच विश्‍वास बसला नाही. न्यायालयाने कान उपटल्यावर मुंबई महापालिकेच्या प्रशासनाला राजीनामा मंजुरीचे पत्र द्यावे लागले. यामध्ये ऋतुजा लटके यांना भरपूर प्रसिद्धी, शिवाय सहानुभूती मिळाली. लटके यांना रोखता आले असते आणि त्यांच्याऐवजी अन्य उमेदवार देण्याची वेळ शिवसेनेवर आली असती तर कदाचित भाजपने अंधेरीची निवडणूक लढविण्याची जोखीम पत्करली असती; पण न्यायालयाच्या निर्णयामुळे ती शक्यता भाजपला सोडून द्यावी लागली. यातूनच राज ठाकरे यांचा पत्रप्रपंच झाला, असे दिसते. कधीकाळी राज यांनी स्वतःबद्दल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल महाराष्ट्राच्या अपेक्षा उंचावून ठेवल्या होत्या. तो आता भूतकाळ झाला आहे. इतरवेळी केंद्रीय यंत्रणांनी राज्यात मांडलेल्या उच्छादावर राज यांनी कोरडे ओढले असते. आता भाजपशी जवळीक असल्याने त्यांच्या दृष्टीने तो मुद्दा गैरलागू झाला आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा दाखला देत त्यांनी अंधेरी निवडणुकीतून भाजपने माघार घ्यावी, असे आवाहन केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जाहीर भूमिका मांडून पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असे सुचविले. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार माघारीचा निर्णय घेण्याच्या विरोधात होते. राज यांनी पत्र लिहिले ते देवेंद्र फडणवीस यांना, मात्र माघारीच्या निर्णयाची घोषणा करण्यासाठी भाजपने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पुढे केले! अपश्रेय टाळण्याचे हे पाऊल भाजपमध्ये सर्वकाही आलबेल आहे, या समजाला तडा देणारे म्हणावे लागेल. राजकीय संस्कृती की पराभवामुळे माघार? असा सवाल शिवसेनेने केला आहे. पवार आणि राज यांनी भाजपचे आभार मानले असले तरी दुखावलेली शिवसेना आभाराचा उच्चार करण्यास तयार नाही. भाजपमधील नेते-कार्यकर्त्यांची जी फळी निवडणूक लढविण्याचा निर्धार करुन बसली होती. त्यांच्यासाठी शिवसेनेची भूमिका जखमेवर मीठ चोळणारी ठरली. संस्कृती आणि परंपरा या बोलण्याच्या गोष्टी झाल्या. माघारीचा निर्णय घेऊन भाजपने नामुष्की टाळली, एवढेच खरे!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा