पुणे : पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात काल रविवार असून टिळक महाराष्ट्र विद्यापीठात विद्यापीठाचे कर्मचारी पहाटे 6.00 वाजता जमले होते, कारण निमित्त होते टिळक महाराष्ट्र विद्यापीठ मॅरेथॉनचे. ’टिळक महाराष्ट्र विद्यापीठ स्पोर्ट्स लीगचे’ आयोजन मागील वर्षी प्रमाणे यावर्षीदेखील करण्यात आले आहे.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ स्पोर्ट्स लीगला कालपासून मॅरेथॉनने सुरुवात झाली. ही मॅरेथॉन रविवारी नऊ ऑक्टोबर रोजी सकाळी 6.30 वाजता टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ते केसरीवाडा अशी 4 किलोमीटरमध्ये पार पडली. विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांनी या मॅरेथॉनला फ्लॅग ऑफ करून सूरुवात करून दिली.

यावर्षीच्या या मॅरेथॉनमध्ये रेमो सुपर संघाने 33 मीनिटे 15 सेकंद अशी वेळ नोंदवत प्रथम क्रमांक तर अन्नपुर्णा डायमंड संघाने 36 मीनिटे 26 सेकंदात दुसरा क्रमांक आणि कांचनजुंगा फायटर्स संघाने 38 मीनिटे 34 सेकंदात तिसरा क्रमांक मिळविला.
तसेच सर्वोत्तम कामगिरी केलेल्या पुरुषांमध्ये त्रिशुल रॉयल्स संघाच्या महेश सांबरे याने 21:47:85 अशी वेळ नोंदविली. तर धवलगिरी डेअरडेविल्स संघाच्या संगमेश्वर शिंगे याने 22:00:26 तर नंदादेवी किंग्ज संघाच्या सचिन याने 22:05:74 या वेळेत सर्वोत्तम कामगिरी केली.

तर महिलांमध्ये रेमो सुपर संघाच्या अमृता कदम हिने 27:55:06 या वेळेत तर अन्नपुर्णा डायमंड संघाच्या कल्याणी तळेकर हिने 29:39:07 या वेळेत दुसरा क्रमांक आणि धवलगिरी डेअरडेविल्स शुभांगी पढेर हिने 30:36:67 अशी वेळ नोंदवत सर्वोत्तम कामगिरी केली.
यामध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, प्रशासकीय सल्लागार प्रणती टिळक यांच्याबरोबर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीदेखील सहभागी झाले होते. या मॅरेथॉनमध्ये उत्साहाने भाग घेत विद्यापीठाच्या कर्मचार्यांनी पहाटे लवकर उठा, व्यायाम करा आणि तंदुरुस्त रहा, असा मौल्यवान संदेश दिला.

यामध्ये त्रिशुल रॉयल्स, लोहोत्से लायन्स, मकालू चॅलेंजर्स, नंदादेवी किंग्ज, के-2 वॉरीयर्स, रेमो सुपर, धवलगिरी डेअरडेविल्स, अन्नपुर्णा डायमंड, कांचनजुंगा फायटर्स, अशा संघातील मॅरेथॉन धावपटूंनी सहभाग घेतला होता.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कर्मचार्यांना एकत्रित आणत त्यांना तंदुरुस्त आरोग्य लाभावे, त्याचप्रमाणे त्यांना व्यायामाची सवय लागावी यासाठी या ’टिळक महाराष्ट्र विद्यापीठ स्पोर्ट्स लीगचे’ आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विद्यापीठ ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी दिली.
