शैलेंद्र रिसबूड, डोंबिवली

लोकमान्य टिळकांचा पहिला ग्रंथ म्हणजे ’ओरायन’. हा ग्रंथ त्यांनी 1893 मध्ये छापून प्रसिद्ध केला. प्रस्तावनेत ऑक्टोबर 1893 अशी नोंद आहे. या ग्रंथामागे पारतंत्र्यामुळे निर्माण झालेल्या आपल्यातील न्यूनगंड नाहीसा करणे व पाश्चिमात्यांचा ज्ञानाच्या क्षेत्रातील तोरा उतरवणे हा लोकमान्य टिळकांचा उद्देश होता. ऑक्टोबर हा ’ओरायन स्मरण महिना’
त्यानिमित्त…

लोकमान्य टिळकांना लाभलेल्या अवघ्या 64 वर्षाच्या आयुर्मानातील जवळजवळ 40 वर्षाच्या सार्वजनिक जीवनातील त्यांच्या यशाकडे अभिमानाने पाहता येतील अशी होती. त्यांनी एकाच वेळी अनेक विषयांना स्पर्श केला. सर्वज्ञानी व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात मनापासून काम करते तेव्हा उत्कृष्ट फलप्राप्तीच होते याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे लोकमान्य टिळक. त्यांच्या चतुरस्र व्यक्तिमत्त्वातून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, उद्योग, व्यापार, अर्थकारण, शेती, धर्मशास्त्र, इतिहास, ज्योतिर्गणित आणि वेद अशा अनेक विषयांवर लेखन व भाषणं केली गेली. पारतंत्र्यातही स्वतंत्र आधुनिक भारताचे चित्र बघणारे ते एक निष्काम कर्मयोगी होते.

आयुष्यभर कर्मयोग साधत असताना त्यांनी ज्ञानयोग सोडला नाही. कर्मयोगातून सवड मिळताच ते ज्ञानयोगाकडे आपसूकच वळायचे, याचीच प्रचिती म्हणजे त्यांनी लिहिलेले तीन महान ग्रंथ अर्थात – ’ओरायन’, ’आर्क्टिक’ आणि ’गीतारहस्य’. या तीनही ग्रंथातून त्यांच्या उच्च प्रतीच्या बुद्धिमत्तेविषयी आदरयुक्त कुतूहल वाटल्यावाचून राहत नाही. या तिन्ही ग्रंथातील कल्पना लहानपणापासूनच त्यांच्या डोक्यात घोळत असल्या, तरी हे ग्रंथ लिहून पुरे झाले ते मात्र त्यांच्या अडचणीच्या दिवसांतच. ते स्वतःच म्हणत की – ’माझ्या ग्रंथांचा योगच असा असतो, की ते अडचणीच्या वेळीचं लिहून होतात’. हे लेखन शक्य झाले, कारण त्यांचा मूळ स्वभाव संशोधनाचा आणि वृत्ती अज्ञानाचा शोध घेणारी होती.

लोकमान्य टिळकांच्या लिहिलेल्या लेखात पंचाहत्तराव्या पुण्यतिथी निमित्ताने 1995 मध्ये त्यांचे नातू कै. जयंतराव टिळक म्हणतात – ’माझे आजोबा पंडितांचे पंडित होते. एकाग्रचित्त करून विचार करणारे संशोधक होते. त्यांचा स्वभाव धाडसी होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग करण्याची त्यांची तयारी होती. ’स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ हा त्यांचा मंत्र तर सार्‍या परतंत्र देशांत असंतोष भडकवून स्वातंत्र्याची ठिणगी फुलवितो….’

लोकमान्य टिळकांना खगोलशास्त्र व पंचांग संशोधनकार्याविषयी आवड व तळमळ होती. हिंदू वापरात असलेल्या पंचांगामध्ये सुधारणा करून त्याला वैयक्तिक आधार देण्यासाठी त्यांनी अनेक ज्योतिषांना प्रोत्साहित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. खगोलशास्त्राचा उपयोग त्यांनी वेदांचा कालखंड ठरवण्यासाठी केला. वैदिक संदर्भ गोळा करून आणि त्याचे सूक्ष्म अध्यायन करून लोकमान्य टिळकांनी वेद केव्हा रचले गेले असतील याची कल्पना मांडली होती. कोणत्याही युरोपियन राष्ट्राच्या संस्कृतीपेक्षा वैदिक संस्कृती ही प्राचीन आहे हे लोकमान्य टिळकांनी ’ओरायन’ ग्रंथ लिहून सिद्ध केले आहे. योगा योगाने 1893 मध्ये शिकागोमध्ये स्वामी विवेकानंद यांनी वेदांती हिंदू धर्माचा संदेश सांगितला आणि त्याच वर्षी भारतात लोकमान्य टिळकांनी ’ओरायन’ ग्रंथातून हिंदू व पाश्चिमात्य तत्त्वविचारांचा तुलनात्मक अभ्यास केला.

लोकमान्य टिळकांचा लहानपणापासूनच भगवद‍्गीतेचा अभ्यास होता. या ग्रंथाच्या अलौकिक सिद्धांताचा त्यांच्या मनावर खोलवर पगडा बसलेला होता. 1871 मध्ये त्यांचे वडील गंगाधरशास्त्री टिळक हे मृत्युशय्येवर असताना, त्यांच्या इच्छेनुसार टिळकांना भगवद‍्गीतेचे प्राकृत टीका अर्थात ’भाषा विवृति’ वाचून दाखवत असताना भगवद‍्गीतेचे अंतिम तात्पर्य काय असेल हा प्रश्न भेडसावू लागला. 1889 साली गीतेच्या ’विभूती विस्तार’ या दहाव्या अध्यायातील श्लोक क्रमांक 35 ’मासानां मार्गशीर्षोऽहम ऋतूनां कुसुमाकर:’ अर्थात ’महिन्यांतला मार्गशीर्ष महिना’ हे वचन वाचून त्यांची कुतूहलता जागृत झाली. त्यांच्या संशोधक स्वभावाप्रमाणे तीन वर्ष अखंड अध्यास करून ’ढहश जीळेप ेी ठशीशरीलहशी ळपीें ढहश Aपींर्र्ळिींळीूं ेष ींहश तशवरी’ या नावाचा प्रबंध त्यांनी लिहिला. 1891 मध्ये पुण्यात या विषयावर त्यांनी दोन व्याख्याने सुद्धा दिली. 1893 मध्ये प्राच्यविद्या विशारदांची सार्वराष्ट्रीय नववी परिषद लंडन येथे भरली. या परिषदेत हा प्रबंध वाचण्यासाठी त्यांनी पाठवला. वास्तविक हा प्रबंध परिषदेचा अहवालात संपूर्ण छापला जायला हवा होता; पण व्यवस्थापकांना तो फार मोठा वाटल्याने त्यांनी फक्त सारांशच प्रसिद्ध केला. लोकमान्य टिळकांचे मात्र त्यामुळे समाधान झाले नाही व त्यांनी हा प्रबंध 1893 मध्ये ग्रंथरूपात छापून प्रसिद्ध केला.

या पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते लिहितात – ’मी

खगोलशात्रीय पद्धत वापरली असली तरी बेन्टली यांच्या ग्रंथाशी तुलना केली असता असे लक्षात येईल की, प्रस्तुत निबंधाचे स्वरूप खगोलशास्त्रीय असण्यापेक्षा अधिक वाङ्मयीन आहे. निराळ्या शब्दात सांगायचे तर, काही विशिष्ट संहितांचा मी मांडलेला अर्थबोध अचूक आहे का, हे पहिल्यांदा संस्कृत विद्वानांनी ठरवायचे आहे. त्यांनी मूल्यनिवाडा दिल्यांनतर ऋग्वेदातील परंपरेचा अचूक कालखंड खगोलशात्रीय दृष्टीने निश्चित करणे अजिबातच अवघड नाही. या विषयाची चर्चा करण्यासाठी खगोलशास्त्राचे काहीच ज्ञान गरजेचे नाही, असा माझ्या म्हणण्याचा अर्थ नाही. पण एकंदरीत खगोलशास्त्रांपेक्षा संस्कृत विद्वानांनी निर्णय घेण्याचा यातील प्रश्न आहे, हे लगेचच कळण्यासारखे आहे’.

’ओरायन’ लिहून झाल्यावर त्याच्या दुसर्‍या आवृत्तीमध्ये फेरफार व दुरुस्त्या कराव्या लागतील ह्याची जाणीव लोकमान्य टिळकांना होती, पण इतर असंख्य कामाच्या व्यापात त्यांना वेळ मिळाला नाही. मंडाले तुरुंगात ’गीतारहस्य’ लिहून झाल्यावर म्हणजे 1913च्या हिवाळ्यात, ’तशवळल उहीेपेश्रेसू’ अर्थात ’वेदांग ज्योतिष’ म्हणजेच ’ओरायन’ची सुधारित अवृत्ती त्यांनी लिहायला घेतली; पण प्रकृती कारणास्तव फक्त दोनच प्रकरणे (साधारण 100 पाने) लिहिता आली हे आपले दुर्दैव.

वेदांचा अभ्यास करणार्‍या पाश्चिमात्य विद्वानांनी वैदिक संस्कृती इ.स. 2400 हजार वर्षापेक्षा जुनी नाही असा एक सिद्धांत मांडला. लोकमान्य टिळकांना ही संशोधनपद्धती एकांगी व सदोष वाटत होती. ऐकेकाळी वर्षाचा आरंभ मार्गशीर्ष महिन्यापासून होत असे, याचा मागोवा जेव्हा त्यांनी घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात आली की वेदांचा काळ आत्तापर्यंत दैवतकथा व फक्त भाषाशास्त्रीय पातळीवरील विचारातून मांडला गेला आहे. वेदांचा कार्यकाळ निश्चित करण्यासाठी प्रा.मॅक्समुल्लर यांनी वाङ्मयीन व भाषिक पद्धतीचा वापर केला तर डॉ. हँग यांनी सुद्धा मॅक्समुल्लर यांच्याच पद्धतीचा वापर केला; पण चिनी वाङ्मयातील कालखंडाचा संदर्भ घेतला. लोकमान्य टिळकांनी मात्र संशोधनची निराळी पद्धत वापरण्याचे ठरविले.

लोकमान्य टिळकांनी आपल्या संशोधनाला सुरवात करण्याअगोदर सुमारे शंभर वर्ष युरोपियन पंडितांनी वैदिक वाङ्मयावर केलेले संशोधन समजून-समजावून घेतले. ते केवळ वेदांवर विसंबून राहिले नव्हते. वेदांमधील अगणित संदर्भ सूचक व खगोल शास्त्रीय खुणांचा काळजीपूर्वक अभ्यास त्यांनी केला. ब्राह्मणग्रंथ व सूत्रे यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. नक्षत्रांपैकी मृगशीर्ष या नावाची व्युपत्ती व अर्थ व मृगशीर्षचे दुसरे नाव ’आग्रहायणी’ यावर रचलेल्या कथा, ग्रीक पुराणातील ’ओरायन’ वरील कथा व त्याचा ’आग्रहायणी’ कथांशी असलेले साम्य वगैरे गोष्टींचा त्यांनी विचार केला आहे आणि शेवटी असे सिद्ध केले आहे की आर्यांचे वेद हे आर्य लोक व प्राचीन ग्रीक लोक परस्परांपासून विभक्त होण्याच्या पूर्वी म्हणजे कमीत कमी साडेचारशे हजार वर्ष पूर्वी रचले गेले आहेत. तर्कावर न विसंबत, वेद आणि वैदिक वाङ्मयाबरोबर नक्षत्रांच्या ज्योतिर्गणिताने जे निष्पन्न झाले तेच लोकांपुढे साधार मांडण्याचा ’ओरायन’ या प्रबंधातून त्यांनी यशस्वी प्रयत्न केला आहे.

’ओरायन’ हा शब्द आज ग्रीक समजला जात असला तरी जेव्हा ग्रीक आणि वैदिक आर्य एकत्र राहायचे तेव्हा तो ’आग्रयण’ या शब्दापासून जन्मास आला असला पाहिजे असे लोकमान्य टिळकांनी एका स्वतंत्र प्रकरणात सिद्ध केले. ’ओरायन’ हे पुस्तक पाहावे तर लहान आकाराच्या जेमतेम अडीचशे पानांचे, परंतु त्याकरिता त्यांना इतर ग्रंथांची अंदाजे कमीत कमी पंचवीस हजार पाने तरी चाळावी किंवा अभ्यासावी लागली. या ग्रंथात त्यांनी कृष्णशास्त्री गोडबोले व शं. बां दीक्षित या दोघा विद्वानांचा आवर्जून उल्लेख केला आहे. लोकमान्य टिळक, ’मासानां मार्गशीर्षोऽहम ऋतूनां कुसुमाकर:’ या वचनाला धरून चार हजार वर्षापर्यंत ख्रिस्ती जन्माच्यामागे गेले. तसे करताना वीसबावीस हजार वर्ष मागे जाण्याची शक्यता असूनही प्राचीनत्वाच्या अवास्तव अभिमानास बळी न पडत चार हजार वर्षांवर ते थांबले, यावरून त्यांचा संयम ध्यानात येतो. शिवाय वैदिक संहितांचा आपण लावलेला अर्थ जर संस्कृत विद्वानांनी अचूक म्हणून स्वीकारला तरच या सिद्धांताला आधार म्हणून मांडलेला पुरावा वैध ठरेल याची लोकमान्य टिळकांना पुरेपूर जाणीव होती.

खुद्द लोकमान्य टिळकांनी या ग्रंथबद्दल ’गीतारहस्य’ ग्रंथात (पान क्रमांक – 760) वर्णन केले आहे. ते म्हणतात – ’महिन्यामध्ये मार्गशीर्षला जे प्रथम स्थान दिले आहे, ते तात्काळी बारा महिन्यांच्या गणना करताना मार्गशीर्ष महिना पहिला धरून मोजण्याची वहिवाट होती….’ मृगशीर्ष नक्षत्रास आग्रहायणी किंवा वर्षंरंभाचे नक्षत्र असे नाव असून मृगादि नक्षत्रगणना जेव्हा प्रचारात होती तेव्हा मृगनक्षत्राला प्रथम अग्रस्थान मिळाले व त्यावरून मार्गशीर्ष महिन्यालाही पुढे श्रेष्ठत्व आले असावे’. सादर ग्रंथाची चोहीकडून अत्यंत प्रशंसा झाली. लोकमान्य टिळकांचे अगाधज्ञान व अपूर्व कल्पकतेने सर्व विद्वान स्तिमित झाले. जर्मन वेदाभ्यासी पंडित याकोबी, ब्लूमफिलड, बार्थ, बुल्हर या प्रभृतींनी लोकमान्य टिळकांच्या युक्तिवादाला दुजोरा दिला, तर थिबो व इतर कित्येकांना टिळकांनी दिलेली प्रमाणे खात्रीलायक वाटली नाहीत. एक वार्षिकोत्सव प्रसंगी भाषण करताताना या गोष्टीला दुजोरा देत ब्लूमफिलड म्हणतात – ’1893च्या वर्षातील सांस्कृतिक क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे ’ओरायन’ या ग्रंथाची निर्मिती होय’.

अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीतील विद्वान, डॉ.ब्लूमफील्ड ’ओरायन’ ग्रंथावर अभिप्राय देताना म्हणतात – ’सुमारे दोन अडीच महिन्यांपूर्वी मजकडे हिंदुस्तानातून एक छोटेखानी पुस्तक संपादकांकडून सप्रेम भेट म्हणून आले. ग्रंथकर्त्याचे नाव बाळ गंगाधर टिळक ङरु-ङशर्लीीींशी व वकील – पुणे. हे नाव मी पूर्वी कधीही ऐकिले नव्हते. पुस्तकाचा आकार छोटा, बांधणी गचाळ व छपाई सदोष असून ते राधाबाई आत्माराम सगुण कंपनी – मुंबई यांनी छापले आहे. ’ओरायन अथवा वेदकालाच्या प्राचीनत्वाविषयी शोध’ असे निबंधाचे नाव आहे. ग्रंथकार सर्वस्वी अप्रसिद्ध, पुस्तकाबद्दल कोणत्याही कारणाने अनुकूल असा पूर्वग्रह माझे ठिकाणी असण्याच्या संभवत नाही. अर्थातच मी ते पुस्तक वामकुक्षीच्या वेळी पाहून जे इतर पुष्कळ भारूड विद्वानांकडून टपालाचे द्वारे जमते त्याप्रमाणेच याचाही वासलात लावणार होतो. प्रस्तावना वाचली, त्यात लेखकाने बेधडक लिहिलेले आढळले की, ऋग्वेदाचा काळ कमीतकमी ख्रि.पु. 4000 पर्यंत नेला पाहिजे. ग्रंथकार पडले हिंदू तेव्हा काल्पनिक गणना करण्यात कुशल असणारच असे म्हणून पुस्तक चाळून पाहू लागलो. मनातून खुळ्या धर्मभोळेपणाला हसत होतो. परंतु इतक्यात सर्व रंग एकदम पालटत चालला. ते मनातील हसू जाऊन, मन जरासे बावचळू लागले. काहीसेच वाटू लागले. वेदवाङ्मय व त्यासंबंधी पाश्चिमात्यांनी लिहिलेले ग्रंथ यांची खडान्खडा माहिती ग्रंथकाराला आहे असा पहिला जबर संस्कार मनावर उठला. अर्थातच ग्रंथ नुस्ता चाळून पाहण्याचे सोडून देऊन त्याचा मनपूर्वक अभ्यास केला असता तो पूर्वीचा सर्व पूर्वग्रह व विरोध मावळू लागला व मी हळूहळू ग्रंथकाराच्या मतौघाबरोबर वाहू लागलो. त्या मतांची सत्यता मला पटली. चालू साली (1893) हा ग्रंथ म्हणजे वाङ्मयात मोठीच क्रांती घडवून आणणारा होय. रा.टिळकांच्या या ग्रंथामुळे जो नवीन दृष्टिकोन उत्पन्न झाला आहे, त्याप्रमाणे सर्व प्राचीन इतिहासाची घडी आता बसवणे जरुरी आहे’.

लोकमान्य टिळकांनी हे संशोधन अशावेळी मांडले जेव्हा भारत पारतंत्र्यात होता. त्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने आणि सप्रमाण मत मांडली. आत्महीनतेच्या भावनेने पोखरून निघालेल्या राष्ट्रांमध्ये त्यांनी अस्मितेचा दीप प्रज्वलित केला. ज्ञान आणि विचार या क्षेत्रात लोकमान्य टिळकांची ही गरुडझेप ठरली. भारतविद्या व पुराणतत्वीय संशोधनात त्यांनी केलेले काम जागतिक दर्जाचे ठरले. देशाची परिस्थिती वेगळी असती तर त्यांनी अनन्यसाधारण ख्याती मिळवली असती. या ग्रंथामुळे जागतिक पातळीवर वेदग्रंथांविषयी अभिमान दुणावला. आपल्या प्राचीन ग्रंथांकडे आमचे विद्वान दुर्लक्ष करतात. त्यांच्यावर संशोधन करत नाहीत व तो अधिकार फक्त पाश्चिमात्य संशोधकांनाच आहे अशी आजवरची नेभळट कल्पना गळून पडली. या ग्रंथामुळे हिंदू संस्कृतीचा झेंडा युरोपियन ज्ञानमंदिरात झळकू लागला.लोकमान्य टिळकांच्या या संशोधनामुळे वेद वाङ्मयावरील सर्व ग्रंथ आता नव्या दृष्टिकोनातून पाहणे विद्वानांना क्रमप्राप्त झाले. लोकमान्य टिळकांनी ’ओरायन’ ग्रंथामधून मांडलेले सिद्धांत आज सर्वमान्य असतील-नसतील पण त्यांनी केले संशोधन म्हणजे ज्ञान साधनेच्या प्रदीर्घ प्रवासातील मैलाचे दगड नक्कीच आहेत आणि हेच खर्‍या ज्ञानोपासकाचे मोठे यश आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा