नवी दिल्ली : भारतीय संघाने गुवाहाटी येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा टी-20 सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताचे दोन आघाडीचे फलंदाज विराट कोहली आणि केएल राहुल यांना इंदूरमध्ये होणार्या मालिकेतील अंतिम सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. टी-20 विश्वचषकासाठी रवाना होण्यापूर्वी दोन्ही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. विराट कोहली कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी मुंबईला रवाना झाला आहे. तर राहुल बंगळुरूला गेला आहे.
सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दोन्ही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. राहुलने दोन्ही सामन्यांमध्य अर्धशतके केली. गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या दुसर्या टी-20 सामन्यात त्याने 28 चेंडूंत 57 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याचवेळी विराट कोहलीहीने 28 चेंडूंत नाबाद 49 धावांची खेळी खेळली.
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघातील खेळाडू 6 ऑक्टोबरला रवाना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा भारतासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. मागील स्पर्धेत, भारत साखळी फेरीतूनच बाहेर पडला. अशा परिस्थितीत यावेळी ऑस्ट्रेलियात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला स्पर्धा जिंकून आपली ताकद दाखवायची आहे.