डेहराडून : चारधाम यात्रेतील महत्त्वाचे असलेल्या केदारनाथ मंदिराच्या मागे सुमारे पाच किलोमीटरवरच्या पर्वतीय क्षेत्रात हिमस्खलन झाले आहे; परंतु मंदिर परिसराचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. या घटनेची भीतीदायक चित्रफीत शनिवारी सोशल मीडियावर फिरत आहे.

रुद्रप्रयाग प्रशासनाने हिमस्खलन झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. चोरबारी हिमनदीच्या पाणलोट क्षेत्रात गुरूवारी सायंकाळी शेकडो टन बर्फाचे खंड पाहता पाहता कोसळले. ही हिमनदी केदारनाथ मंदिराच्या उत्तरेपासून दक्षिणेला सुमारे सहा चौरस किलोमीटर परिसरात आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

राष्ट्रीय महामार्ग 109 वर रुद्रप्रयाग येथे भूस्खलन झाल्याने मोठ मोठे दगड आणि मातीचे ढिगारे रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे हा मार्ग बंद झाला आहे. या परिसरात मुसळधार वृष्टी अंतर्गत तेथे हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. आणखी काही दिवस वृष्टीचा इशाराही दिला आहे.

2013 मधील कटू आठवणी जाग्या

2013 मध्ये चोरबारी तलाव फुटल्यामुळे मंदाकिनी नदीला पूर आला होता. त्यामुळे सुमारे पाच हजार भाविकांचा मृत्यू झाला होता. हिमस्खलनाच्या या घटनेमुळे 2013 मधील कटू आठवणींना उजाळा मिळाला आहे. तेव्हा मंदिराच्या पाठीमागे एक मोठा खडक पडला होता. त्यामुळे पुराचे पाणी विभागून वाहत गेले होते. मंदिराचे तेव्हाही नुकसान झाले नव्हते. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या देखरेखीखाली केदारनाथ धाम पुनर्विकास प्रकल्पाची पायाभरणी केली. त्या अंतर्गत संपूर्ण मंदिर परिसराचे पुनर्वसन करण्यात आले. धाममध्ये भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था केली होती. विकासासंबंधी सर्व प्रकारची कामे झाली. नद्यांच्या काठावर पक्के घाट बांधले गेले. जलकुंभांची निर्मिती केली गेली. हेलिपॅड, रुग्णालये, प्रवाशांसाठी लॉज, पंडे आणि पुरोहितांसाठी निवारे बांधण्यात आले. आदी शंकराचार्य यांचे स्मारक बांधले. सध्या मंदिराच्या गर्भगृहात सोन्याचा मुलामा चढवण्याचे काम सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा