पुरुषोत्तम करंडकाच्या परीक्षकांचा सवाल

पुणे : विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहण्याच्या नादात आपण त्यांना बक्षिसावलंबी करणार आहोत का? यातून करंडक जिंकलात तरच तुम्ही मोठे असा संदेश पसरत आहे. स्पर्धेचा आनंद लुटावा, कोणताही निकाल आनंदाने स्वीकारावा हा संस्कार आपण देणार आहोत की नाही? अशा शब्दांत पुरुषोत्तम करंडकाच्या निकालावर टिपण्णी करणार्‍यांना परीक्षकांनी गुरूवारी सुनावले.

महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे पुरुषोत्तम निकालासंबंधी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात राजेंद्र ठाकूरदेसाई, परेश मोकाशी, पौर्णिमा मनोहर, प्रवीण भोळे यांनी सहभाग घेतला होता. यावेळी आयोजकांची भूमिका, स्पर्धेचे नियम, परीक्षकांचे अधिकार याबाबत भूमिका मांडण्यात आली. तसेच उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्‍नांना यावेळी उपस्थितांनी उत्तरे दिली.

विद्यार्थ्यांना दोष दाखविणारा, त्यांना कलेत सुधारणा करा असे सांगणारा? तसेच विद्यार्थ्यांना करंडक न देणारा, प्रत्येक वेळी तुमचा शत्रू नसतो. तर, तो तुमचा हिंतचिंतक अधिक असतो. परीक्षकांनी विद्यार्थ्यांवर अन्याय केला असे तुम्हाला वाटत असेल, तर त्या विचारातून बाहेर पडा. आम्ही दर्जाबाबत नाही, तर कलेबाबत विचार केला आहे. कदाचित हेच विचार उद्या तुम्हाला पटायला लागतील, अशी भूमिका परीक्षकांच्या वतीने परेश मोकाशी यांनी व्यक्त केली.
राजेंद्र ठाकूरदेसाई म्हणाले, स्पर्धेच्या आधीच सहभागी संघांना या स्पर्धेचे नियम सांगितले जातात. परीक्षकांचा निकाल अंतिम असतो. त्यात आयोजक संस्था हस्तक्षेप करत नाही. परीक्षकांना करंडक देण्यास एकांकिका पात्र नसल्याचे वाटल्यास करंडक न देण्याचा नियम आहे. मात्र सांघिक विजेतेपद, द्वितीय आणि तृतीय पुरस्कारासह अन्य पुरस्कार दिले जावेत, असाही नियम आहे. त्यामुळे करंडक न देता इतर पुरस्कारांची परीक्षकांनी घोषणा केली आहे. याआधी याच निकालाप्रमाणे औरंगाबाद केंद्रावर राज्यस्तरीय स्पर्धेत करंडक न देता सांघिक विजेतेपद देण्यात आले असल्याचा दाखलाही ठाकूरदेसाई यांनी दिला.
पौर्णिमा मनोहर म्हणाल्या, करंडक दिला नाही म्हणून एकांकिका चांगली नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. जर करंडक न देण्याची तरतूद नियमात आहे, तर परीक्षकांच्या नावाने एवढा गदारोळ कशासाठी? इतर पुरस्कार द्यावेत, असा नियम आहे. आम्ही नियमांचे पालन केले आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्याच बाजूने आहोत. शुभांगी दामले, योगेश सोमण, अमित वझे यांच्यासह संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्‍यांनी यावेळी मत व्यक्त केले. मिलिंद शिंत्रे यांनी सूत्रसंचालन केले.

नाटकांच्या दर्जाची चिंता नकोच

५६ वर्षांपूर्वी या स्पर्धेचे नियम करण्यात आले आहेत. त्यातील काही नियम आता लागू होतील असे नाही. काही नियम काळाप्रमाणे बदलले पाहिजेत. त्याचा विचार आयोजकांनी करावा. तसेच एकांकिका आणि नाटकांच्या दर्जाबाबत परीक्षकांसह अन्य कोणीही चिंता करण्याचे कारण नाही. त्याचा दर्जा उत्तमच असणार आहे. ज्याला चिंता करायची आहे, त्यांनी राज्यभरातील नाट्यगृहांच्या असुविधेचा विचार करावा, ज्येष्ठ कलाकारांच्या प्रश्‍नांविषयी आवाज उठवावा. चित्रपटगृहाच्या असुविधेविषयी आवाज उठवून आंदोलन करावे, अशा शब्दांत ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख प्रवीण भोळे यांनी टीका करणार्‍यांचा समाचार घेतला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा