नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आता मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी यांची नावे चर्चेत आली आहेत.

राहुल गांधी भूमिकेवर ठाम राहिल्यास अध्यक्षपदासाठी निवडणूक अटळ आहे. अशा स्थितीत राजस्तानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नावास पक्षाची सर्वाधिक पसंती असेल! सध्या त्यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे.

असंतुष्ट ‘जी-23’ गटाचे शशी थरुर हेही अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. दिग्विजयसिंग यांनीदेखील आपण इच्छुक असल्याचे संकेत दिले आहेत. आता कमलनाथ आणि तिवारी यांची नावे जोडली गेली आहेत.

याव्यतिरिक्त पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खर्गे, कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची नावेही चर्चेत आहेत.सूत्रांच्या मते, चव्हाण आणि वासनिक निवडणूक लढविण्यास तयार नाहीत. थरूर यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेत आपण इच्छुक असल्याचे सांगितले.

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक दोन दशकांनंतर होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने गुरूवारी अधिसूचना जारी केली. त्यानुसार, 24 ते 30 सप्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. 1 ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होईल. तर, 8 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येईल. त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास 17 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. तर, 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर होईल. या निवडणुकीत 9 हजारांहून अधिक प्रदेश काँग्रेस समितीचे प्रतिनिधी मतदान करतील. राहुल गांधी भूमिकेवर ठाम राहिल्यास राजस्तानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि शशी थरुर यांच्यात लढत होईल. 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर राहुल यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा