नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपयाने गुरूवारी नवीन नीचांकी पातळी गाठली. डॉलरच्या तुलनेत रुपया तब्बल 90 पैशांनी घसरून 80.86 वर बंद झाला. परवा रुपया 22 पैशांनी घसरला होता.

काल सुरूवातीच्या व्यवहारातच रुपया 51 पैशांनी घसरला. दिवसअखेर त्यात आणखी भर पडली आणि रुपया 80.86 च्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर बंद झाला.

चलनवाढीवर आळा घालण्यासाठी अमेरिकी फेडरल बँकेने व्याजदर 0.75 टक्क्यांनी वाढवले. त्याचा दबाव भारतीय रुपयावर पडला, त्यामुळे देशांतर्गत चलनात मोठी घसरण झाली. रुपयाचा व्यवहार 80.27 वर सुरू झाला आणि 80.86 वर बंद झाला.

बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 22 पैशांनी घसरला होता. याआधी, 20 जुलै रोजी प्रथमच रुपया 80.05 वर बंद झाला होता. त्यानंतर, रुपया काहीसा सावरला होता. मात्र, आता पुन्हा रुपया कमकुवत झाला आहे. येत्या काळात रुपया 81 ते 82 ची पातळी गाठू शकतो, अशी भीती वर्तविली जात आहे.

अमेरिकेस महगाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे अमेरिकी फेडरल बँकेने सलग तिसर्‍यांदा व्याजदरात वाढ केली. फेडरल रिझर्वचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्याजदरात 0.75 टक्क्यांची वाढ केली. याआधी, 27 जुलै रोजीदेखील व्याजदरात वाढ करण्यात आली होती.

दरम्यान, मुंबई शेअर बाजारात सलग दुसर्‍या दिवशी विक्रीचा मारा पाहायला मिळाला. काल निर्देशांक 337.06 अंकांनी घसरुन 59.119.72 वर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 88.55 अंकांनी घसरुन 17,629.80 वर बंद झाला.

बुधवारी निर्देशांक 262.96 अंकांच्या घसरणीसह 59,456 वर बंद झाला होता. तर निफ्टी 97.90 अंकांनी घसरुन 17,718 वर बंद झाला होता. गेल्या आठवड्याचा शेवट मोठ्या पडझडीने झाला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा