रंगभूमीदिनी दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते सन्मान

सांगली : सांगली येथील अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समितीतर्फे यंदाचा प्रतिष्ठेचा नाट्याचार्य विष्णुदास भावे पुरस्कार पुण्याचे ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, पटकथा लेखक सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे.

समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी या पुरस्काराची घोषणा पत्रकार बैठकीत नुकतीच केली. रंगभूमीदिन ५ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे. गौरव पदक, रोख रक्कम 25 हजार, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी विनायक केळकर, विलास गुप्ते, मेघा केळकर, जगदीश कराळे, आनंदराव पाटील, बलदेव गवळी, प्राचार्य भास्कर ताम्हणकर, विवेक देशपांडे, भालचंद्र चितळे उपस्थित होते.

डॉ. कराळे म्हणाले, नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या व्यक्तीस १९५९ पासून समितीकडून प्रतिवर्षी विष्णुदास भावे गौरवपदक प्रदान करण्यात येते. कोरोनामुळे दोन वर्षे सोहळ्यात खंड पडला होता. परंतु आता सरकारने सर्व निर्बंध रद्द केले आहे ; त्यामुळे यंदा हा सोहळा आयोजित केला आहे.
अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर ही संस्था ८० वर्षापासून नाट्यक्षेत्रात कार्यरत आहे. आद्यनाटककार विष्णुदास भावे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रंगकर्मीस हा पुरस्कार प्रदान करण्यात येते.

रंगकर्मी सतीश आळेकर यांनी रंगभूमीशी संबंधित विविध क्षेत्रात योगदान दिले आहे. 1973 ते 1992 पर्यत थिएटर अकादमी संस्थेचे व्यवस्थापक पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. 1996 ते 2000 दरम्यान, पुणे विद्यापीठात ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत होते. तसेच सप्टेंबर 2013 पासून पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. त्यांना नाट्यक्षेत्रातील राज्य सरकारचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कारासह अन्य पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा