मुंबई महापालिकेचा निर्णय

मुंबई, (प्रतिनिधी) : दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे, यासाठी शिवसेनेचे दोन्ही गट आक्रमक असल्याने मुंबई महापालिकेने कायदा व सुव्यस्थेचे कारण देऊन दोघांनाही परवानगी नाकारली आहे. महापालिकेचे रागरंग ओळखून शिवसेनेने आधीच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती व त्यांच्या अर्जावर आज (शुक्रवारी) सुनावणी होणार आहे. तर शिंदे गटानेही न्यायालयात आपली बाजू ऐकावी, यासाठी हस्तक्षेप अर्ज दाखल केला. न्यायालय काय निर्णय देणार व न्यायालयाने परवानगी दिली नाही तर शिवसेनेची भूमिका काय असणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोनतृतीयांश आमदार-खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बंड केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली आहे. आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत शिंदे गटाने पक्षावर व पक्षाच्या चिन्हावरही दावा केला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात व निवडणूक आयोगासमोर कायदेशीर लढाई सुरू आहे. एकीकडे, हा संघर्ष सुरू असताना शिंदे गटाने आपला गट हीच खरी शिवसेना असल्याने शिवाजी पार्कवरील परंपरागत दसरा मेळावाही आम्हीच घेणार, अशी भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेबरोबरच शिंदे गटाने शिवाजी पार्क मैदान मिळावे, यासाठी महापालिकेकडे अर्ज केला होता. यामुळे वातावरण तापले होते. शिंदे गटात सहभागी झालेले स्थानिक आमदार सदा सरवणकर व शिवसैनिकांमध्ये संघर्ष होऊन हवेत गोळीबार करण्यापर्यंत प्रकरण गेले. दोन्ही गटांनी हा प्रतिष्ठेचा मुद्दा केला होता. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगत महापालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे.

आज उच्च न्यायालयात सुनावणी

शिंदे सरकारच्या दबावामुळे महापालिका दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क उपलब्ध करून देणार नाही याचा अंदाज असल्याने शिवसेनेने आधीच मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर काल सुनावणी होणार होती. मात्र, आता आज ही सुनावणी होणार आहे. दरम्यान, शिंदे गटानेही निर्णय देण्यापूर्वी आपली बाजू ऐकून घ्यावी यासाठी हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे.

न्याय मिळेल अशी अपेक्षा : परब

शिवसेनेच्या परंपरागत दसरा मेळाव्यात अडथळे आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत. परंतु, उच्च न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे व न्याय मिळेल, असा विश्वास माजी मंत्री व शिवसेना नेते अनिल परब यांनी व्यक्त केला. प्रथम येणार्‍यास प्राधान्य या तत्त्वानुसार, शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर परवानगी मिळाली पाहिजे. न्यायालयाने परवानगी दिली नाही तरी शिवसैनिक शिवतीर्थावरच जमतील, अशी आक्रमक भूमिका काही शिवसेना नेत्यांनी घेतली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा