पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि सभागृहातील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची ओळख निर्भीड नेता म्हणून आहे. ओठात एक पोटात एक, असे अजित पवार करत नाही. मनात आले ते बोलून दाखवणार, असा अजितदादांचा स्वभाव आहे. पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमोर तर दादा आणखीनच खुलून बोलतात. शहर कार्यकारिणीच्या आढावा बैठकीत अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. “सरकारमध्ये असताना किती वेळा मी गृहमंत्रिपद मागितलं, पण वरिष्ठांनी काय दिले नाय… त्यांना वाटतं याला गृहमंत्रिपद दिल्यावर हा आपले ही ऐकणार नाही..”, असे अजितदादा म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची आढाव बैठक संपन्न झाली. या बैठकीत आपल्या भाषणात अजित पवार यांनी मनातील इच्छा कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवली. “जेव्हा जेव्हा मी उपमुख्यमंत्री झालो तेव्हा तेव्हा मी वरिष्ठांकडे गृहमंत्रिपद मागितले. पण मला दिले नाही”, अशी खंत अजित पवार यांनी हसत हसत बोलून दाखवली.

“अजित पवार यांचे भाषण सुरु असताना मंचावरील एका पदाधिकाऱ्याने दादांकडे कुठलीशी मागणी केली. त्यावर अजित पवार म्हणाले, माझ्या ओठात एक आणि पोटात एक असे नसते, हे सगळ्यांना माहिती आहे. आपण सत्तेत असताना मला गृहमंत्रिपद द्या, असे वरिष्ठांना मी सतत म्हटले. पण मला काही गृहमंत्रिपद दिले नाही… जेव्हा जेव्हा उपमुख्यमंत्री झालो तेव्हाच गृहमंत्री करा म्हटले, पण वरिष्ठांनी तसा निर्णय काही घेतला नाही”.

“मागे अनिल देशमुख यांच्यावेळीच मी गृहमंत्रिपदाची मागणी केली पण त्यावेळीही मला दिलं नाही. त्यांचे गेल्यावरही मागितले तर त्यावेळी दिलीप वळसे पाटलांकडे गृहमंत्रालयाची धुरा दिली गेली. माझ्याकडे गृहमंत्रालयाचा कार्यभार दिल्यानंतर मी त्यांचे ही ऐकणार नाही, असे वरिष्ठांना वाटत”, असे अजित पवार म्हणताच सभागृहात हशा पिकला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा