पर्यटनमंत्री यांच्या हस्ते ई-बस व बायोटॉयलेटचे लोकार्पण

सातारा, (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील पर्यटन आता प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होणार असून, यासाठी गुरूवारी राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते तिथे सुरू करण्यात येत असलेल्या 4 ई- बसेसचे, तसेच बायोटॉयलेट सुविधेचे लोकार्पण करण्यात आले. तेथील पर्यटनाला चालना देण्यासाठी वॉक वे, तसेच दर्शन गॅलरी सुरू करणे, स्थानिकांना रोजगार वाढविण्यासाठी आराखडा तयार करणे, सुरक्षा वाढविणे, तसेच घनकचरा व्यवस्थापन याबाबतही कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री लोढा यांनी सांगितले.

मंत्रालयातून मंत्री लोढा यांच्या हस्ते दूरचित्रप्रणालीव्दारे, ई-बसेसचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाला प्रोत्साहन दिल्याबद्दल मंत्री लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सरपंच यांचे आभार मानले. कास पठाराच्या संवर्धनासाठी, तसेच या माध्यमातून स्थानिकांना रोजगार वाढविण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

याप्रसंगी अपर मुख्य सचिव नितीन करीर, पर्यटन संचालक मिलींद बोरीकर, सहसंचालक धनंजय सावळकर उपस्थित होते. दूरदृश्यप्रणालीव्दारे सातारा येथून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, पर्यटन विभागाच्या सहायक संचालक सुप्रिया करमरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री लोढा म्हणाले, पर्यटन विकासासाठी सर्वांचेच सहकार्य आवश्यक आहे, स्वित्झर्लंडपेक्षाही सुंदर असलेल्या कास पर्यटनाचा ठेवा जपण्यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या ठिकाणी वन्य प्राण्यांचा वावर वाढून नैसर्गिकरित्या कास पठार अधिक फुलावे यासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा