तिरुअनंतपुरम : केरळमध्ये एनआयएच्या कारवाईचा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. याविरोधात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. तसेच, आज (शुक्रवारी) एका दिवसाच्या बंदचे आयोजन केले आहे.

पीएफआयच्या राष्ट्रीय नेत्यांसह विविध कार्यकर्त्यांच्या घरे आणि कार्यालयांवर एनआयएने छापे घातले. तसेच 20 हून अधिक जणांना अटक करण्यात आली. या कारवाईचा पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी राज्यांत अनेक ठिकाणी निषेध केला.

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप पीएफआयचे सरचिटणीस अब्दुल सतार यांनी केला. तसेच, आज सकाळी 6 ते सायंकाळी 6 यावेळेत राज्यात बंदचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. एनआयएच्या अधिकार्‍यांनी बुधवारी मध्यरात्रीच कारवाईस सुरूवात केली. पहाटेच्या सुमारास ही बातमी वार्‍यासारखी पसरली. त्यानंतर, पीएफआयचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले. खबरदारी म्हणून संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला होता. तिरुवनंतपुरम, कोल्लम, कोट्टायम, एर्नाकुलम आणि त्रिशूरसह जवळपास सर्व जिल्ह्यांत निदर्शने झाली.

पीएफआयचे प्रदेशाध्यक्ष सीपी महमद बशीर, राष्ट्रीय अध्यक्ष ओएम ए सलाम, राष्ट्रीय सचिव नसरुद्दीन इलामाराम आणि इतरांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा