मुंबई, (प्रतिनिधी) : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी करण्याची शिवसेनेची व्यूहरचना असून, राज्यभर जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी स्वतः आदित्य ठाकरे रस्त्यावर उतरणार असून उद्या (शनिवारी) तळेगाव येथे आदित्य ठाकरे यांच्या नेत़त्वाखाली आंदोलन होणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारचे दुर्लक्ष व बोटचेप्या धोरणामुळे वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला असा आरोप आदित्य यांनी केला होता. या प्रकल्पानंतर बल्क ड्रग पार्क देखील बाहेर गेले. यामुळे महाराष्ट्राला मिळणारा मोठ्या प्रमाणातील रोजगार बाहेर गेला. प्रकल्प बाहेर गेल्याने 1.54 लाख कोटींची गुंतवणूक तर महाराष्ट्राने गमावलीच; पण 1 लाख रोजगार देखील आपण गमावले, असा आदित्य यांचा आरोप आहे. शिंदे-फडणवीस सरकारने यासाठी आधीच्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारला जबाबदार धरले असले तरी, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी अत्यंत आक्रमकपणे हा विषय लावून धरला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा