मुंबई, (प्रतिनिधी) : कामाच्या ताणामुळे जेरीस आलेल्या पोलिसांच्या सुट्यांमध्ये वाढ करण्याचा, तसेच वर्ग-3 मधील लिपिकांची सर्व रिकामी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

राज्यातील पोलिस शिपाई ते पोलिस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजा 12 वरून 20 करण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य शासकीय कर्मचार्‍यांना एक वर्षांत 12 ऐवजी 8 रजा मंजूर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. नंतर विशेष बाब म्हणून 12 दिवस नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आल्या. मात्र, पोलिसांवरील कामाचा वाढता ताण, विविध सण आणि उत्सवाच्या अनुषंगाने बंदोबस्त, व्हीआयपी ड्युट्या यामुळे या नैमित्तिक रजा आणखी वाढवून 20 दिवस करण्यास काल मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

लिपिकांची सर्व रिकामी पदे एमपीएससीद्वारे भरणार

राज्यातील वर्ग-3 मधील लिपिकांची सर्व रिकामी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सध्या राज्यातील अ आणि ब गटातील अधिकार्‍यांची रिकामी पदे भरण्याची कार्यवाही आयोगामार्फत केली जाते. आयोगाच्या कार्यक्षमतेचा विचार करून मुंबई प्रमाणेच राज्यभरातील लिपिकांची देखील रिकामी पदे आयोगामार्फतच भरण्यात यावीत, असे ठरवण्यात आले आहे.

डबघाईला आलेल्या संस्थांसाठी पुनर्रचना कंपनी

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्य शासन विविध संस्थांना जमीन, भागभांडवल, अनुदान, कर्ज हमी देते. त्यांच्या मालमत्ता वेगवेगळ्या कारणास्तव संकटात सापडल्या, तर त्यांच्या पुनर्निर्माणात शासनाची भूमिका मर्यादित असते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा