पवारांचे राज्य सरकारला आव्हान

मुंबई, (प्रतिनिधी) : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केलेले आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी फेटाळून लावले. आपली चौकशी करायची असेल तर लवकरात लवकर करा, असे आव्हान देतानाच; आरोप खोटे ठरल्यास त्यांच्यावर काय कारवाई करणार, हेही सरकारने सांगावे, असे पवार म्हणाले.

केंद्रात कृषी मंत्री असताना शरद पवार यांनी पत्राचाळीचा विकासक ठरवण्यासाठी दोन बैठका घेतल्या होत्या. तत्कालीन गृहनिर्माण सचिवांनी सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिलेल्या पत्रात पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पत्राचाळ प्रकरणाचे शरद पवार हेच ‘रिंग मास्टर’ असून, त्यांच्या सहभागाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी उप मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

पवार यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हे आरोप फेटाळून लावले. कोणत्याही चौकशीला आपण कधीच नाही म्हटलेले नाही. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करायची असेल तर लवकरात लवकर करा. पण, जर आरोप खोटे ठरले तर काय करणार हेही सरकारने स्पष्ट करावे असेही पवार म्हणाले. तसेच भाजप सरकारच्या काळात अन्य पक्षाच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्याचा कार्यक्रम सुरू असल्याचे तपशीलवार वृत्त कालच एका वृत्तपत्रात आले असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

त्या बैठकीत कोणताही निर्णय नाही

या पत्रकार परिषदेला माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते. या प्रकरणाची माहिती देताना त्यांनी 14 जानेवारी 2006 रोजी शरद पवार यांनी पत्राचाळीतील भाडेकरूंच्या प्रश्नासाठी बैठक घेतल्याचे मान्य केले; पण त्याचवेळी पवार नेहमीच राज्यातील विविध प्रश्नांसाठी बैठका घेत असतात याकडे लक्ष वेधले. सर्वांशी चर्चा करुन मध्य मार्ग काढणे हाच हेतु त्या बैठकीत होता. या बैठकीला सर्व अधिकारी आणि संबंधित उपस्थित होते. स्वाधीन क्षत्रिय तेव्हा गृहनिर्माण सचिव होते. त्यांनी या बैठकीचे इतिवृत्त केले. या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. न्यायालयाचा निर्णय विचारात घेऊन सरकारने निर्णय घ्यावा, असे मत पवार यांनी व्यक्त केले होते. तसा उल्लेखही इतिवृत्तात आहे. तरीही पराचा कावळा करण्यात येत आहे, हे बदनामीचे कारस्थान असल्याची टीका आव्हाड यांनी केली.

राज ठाकरे यांना टोला

मनसेच्या टीकेबद्दल प्रतिक्रिया विचारता, ’ज्यांना हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सुद्धा आमदार निवडून आणता येत नाही, त्यांच्याबद्दल काय भाष्य करायचे’, असा टोला शरद पवार यांनी लगावला. शिवसेना म्हणजे राष्ट्रवादीच्या पिंजर्‍यातील मांजर असल्याची टीका मनसेने केली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा