पुणे : आपण 21व्या शतकाकडे जाताना भांडारकर संस्थेने जे संशोधनाचे कार्य केले आहे, त्या कार्याचा देशाला अभिमान आहे, अशा शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी भांडारकर संस्थेचा गौरव केला.

भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतर्फे ‘भारत विद्या’ ऑनलाइन पोर्टलचे उद्घाटन सीतारामन यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. यावेळी उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भांडारकर नियामक मंडळाचे अध्यक्ष सदानंद फडके, कार्यकारी अध्यक्ष भुपाल पटवर्धन, कोषाध्यक्ष संजय पवार आणि संस्थेचे विश्‍वस्त आणि माजी खासदार प्रदिप रावत आदी उपस्थित होते.

सीतारामन म्हणाल्या, भांडारकर संस्थेने प्राच्यविद्या आणि हस्तलिखिते तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांसमोर आणले आहेत. त्यामुळे तरूणाईला याचा निश्‍चितच फायदा होणार आहे. ऑनलाइनच्या माध्यमातून देशासह जगभरातील अभ्यासकांना ही कागदपत्रे अभ्यासता येणार आहेत. जगाला नेमके काय हवे, हे ओळखून संस्थेने ऐतिहासिक दस्तावेज तंत्रज्ञानाला जोडला आहे. संस्थेची ही दूरदृष्टी कौतुकास्पद आहे.

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात मुलांना तत्वज्ञान शिकताना समकालीन ज्ञान देण्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एका विशेष विषयासह अन्य विषयांचाही अभ्यास करता येणार आहे. भारत समजून घ्यायचा असेल, तर त्यातील विविधता समजून घेतली पाहिजे. कारण विविधतेत एकतेचे बीज आहे. त्यामुळे शिक्षण, गणित, आरोग्य, संस्कृत समजून घेतले पाहिजे. भांडारकर संस्थेने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऐतिहासिक ज्ञान जगाला उपलब्ध करून दिले असल्याचेही सीतारामन यांनी यावेळी स्पष्ट केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, 20 व्या शतकापर्यंतचा इतिहास अभ्यासक्रमातून शिकविला जातो. मात्र 20 व्या शतकाच्या आधीच्या इतिहासाबाबत प्रश्‍न उपस्थित केले जातात. त्यामुळे आधीच्या इतिहासाबाबत संशोधन होणे आवश्यक आहे. अनेक संघर्षानंतर भांडारकर प्राच्यविद्या ही संस्था आपले ध्येय न सोडता ताठ उभे राहून यशस्वी वाटचाल करत आहे. अत्यंत जुन्या असणार्‍या या संस्थेने पोर्टल तयार केल्याने त्याचा फायदा आजच्या पिढीला होणार आहे. प्रदिप रावत यांनी मनोगत व्यक्त केले. भुपाल पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले. सदानंद फडके यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा