काश्मीर प्रश्‍न उपस्थित केल्याने संताप

संयुक्‍त राष्ट्र : तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी संयुक्‍त राष्ट्रांच्या परिषदेत काश्मीरचा मुद्दा उकरून काढल्याने भारताने तीव्र नाराजी व्यक्‍त केली आहे.

ते म्हणाले, भारत आणि पाकिस्तान यांनी 75 वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळविले आहे; पण दोन्ही देशांत शांतता, एकता स्थापन झालेली नाही. ही बाब दुर्देैवी आहे. काश्मीरमध्ये कायमस्वरूपी शांतता स्थापित होईल, अशी आशा करूया. गेल्या वर्षीही काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हासुद्धा अंतर्गत बाबीत ढवळाढवळ खपवून घेतली जाणार नाही. देशाच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाणार नाही, असे भारताने बजावले होेते. त्यानंतर त्यांनी पुन्हा काश्मीरबाबत वक्‍तव्य केल्याने भारताने तीव्र नापसंती व्यक्‍त केली आहे.

जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. या प्रश्‍नात तिसर्‍या पक्षाचा हस्तक्षेप अमान्य असल्याचे भारताने ठणकावले आहे. विशेष म्हणजे भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी तुर्कस्तानचे परराष्ट्रमंत्री मेव्हलुत कावुसोग्लू यांच्याशी सायप्रस मुद्द्यावर चर्चा केली. 1974 मध्ये ग्रीकच्या अधिपत्याखाली असलेल्या सायप्रस येथे बंड झाल्यानंतर तुर्कस्तानने तेथे आपले सैन्य पाठविले होते. त्याबाबतही संयुक्‍त राष्ट्राच्या ठरावानुसार शांततापूर्ण तोडगा काढावा, अशी मागणी भारताने केली आहे. त्यामुळे खवळलेले तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी काश्मीर राग आळवल्याची चर्चा सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा