उद्धव ठाकरे यांचे आव्हान

मुंबई, (प्रतिनिधी) : मुंबई महापालिका जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, मिंधे सेना, त्यांचे चेलेचपाटे मुन्नाभाईला सोबत घेऊन मैदानात उतरले आहेत. मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी त्यांना शिवसेना, ठाकरे कुटुंब संपवायचे आहे. परंतु त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत. अमित शहा यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी एका महिन्यात मुंबई महापालिका आणि सोबत विधानसभेचीही निवडणूक घेउन दाखवावी. शिवसेनेला जमीन दाखवायची भाषा करणार्‍यांना अस्मान दाखवू, असे थेट आव्हान देत उद्धव यांनी बुधवारी महापालिका निवडणुकीचा बिगुल फुंकला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणताहेत त्यांच्या आयुष्यातील ही शेवटची निवडणूक असल्यासारखे ते लढणार आहेत. ते शेवटचीच निवडणूक म्हणून लढणार असतील तर तुम्हीही आयुष्यातील पहिली निवडणूक असल्यासारखे लढा, असा कानमंत्र देताना, शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होईल असेही त्यांनी ठणकावले.

सत्तांतरानंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांचे गटप्रमुखांच्या मेळाव्यात जाहीर भाषण झाले. आपल्या भाषणात त्यांनी भाजपासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंदेगट यांच्यावर टीका केली.

पुढे ते म्हणाले, आमच्यामुळे वेदांत-फॉक्सकॉन गेला हे धादांत खोटे आहे. वेदांत गुजरातला गेल्यानंतर केंद्राने लगेचच सवलती दिल्या आहेत. म्हणजे यांचे आधीच ठरले होते. एक-एक उद्योग राज्यातून बाहेर जात आहेत. पण मिंधे गट दिल्लीसमोर मुजरे करत आहे. मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र आहे. पण धारावीत होणारे आर्थिक केंद्रही गुजरातला पळविले. महाराष्ट्रात आरोग्य क्षेत्रासाठी ज्या पायाभूत सुविधा आम्ही निर्माण केल्या त्या संपूर्ण देशात कोणी निर्माण केल्या ते दाखवा असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिले.

मिंधे गट व बाप पळवणारी टोळी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत गेलेल्या आमदार, खासदारांवर उद्धव ठाकरे जोरदार टीका केली. आतापर्यंत मी मुले पळवणारी टोळी बघितली होती. पण आता बाप पळविणारी टोळी फिरत असल्याची टीका करताना शिंदे गटाचा त्यांनी ’मिंधे सेना’ असा उल्लेख केला. भाजपच्या ’मिशन मुंबई’ वर टीका करताना ते म्हणाले की, ’मुंबईचे लचके तोडण्यासाठी आता गिधडे फिरायला लागली आहेत. मुंबई त्यांच्यासाठी चौरसफुटाची जमीन असेल. पण आमच्यासाठी ती मुंबा आई आहे, आमची मातृभूमी आहे. मुंबई आणि या कमळाबाईचा संबंधच काय. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत माझे आजोबा प्रबोधनकार हे अग्रणी होते. तेव्हा याच जनसंघाने मराठी माणसाची एकजूट फोडली होती. भाजपसोबतच्या युतीत आमची 25 वर्षे सडल्याचा पुनरूच्चारही उद्धव यांनी केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा