नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत आता ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांचेदेखील नाव जोडले गेले आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबत त्यांनी स्पष्टपणे नकारही दिला नाही किंवा स्पष्टपणे होकारही दिला नाही.

काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक कोणीही लढवू शकतो. त्यापासून कोणालाही रोखता येत नाही किंवा कोणावर निवडणूक लढविण्यास दबाव टाकता येत नाही. गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीने यापूर्वी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे, असेही दिग्विजय सिंग यांनी म्हटले आहे. आपण निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत का? असा सवाल सिंग यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले की, बघू यात पुढे काय होते? निवडणूक लढण्याचा सर्वांना अधिकार आहे. मात्र, याबाबतचे चित्र 30 स्पटेंबर रोजी स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले. अध्यक्षपसासाठी उमेदवारी दाखल करण्याची 30 स्पटेंबर अखेरची मुदत आहे.

पंजाब, तेलंगणा काँग्रेसचाही ठराव

राहुल गांधी यांनीच अध्यक्षपद स्वीकारावे, या आशयाचा ठराव पंजाब आणि तेलंगणा काँग्रेसने बुधवारी केला. आतापर्यंत एक डझनहून अधिक प्रदेश काँग्रेसने यासंदर्भात ठराव केला आहे. दोन दशकानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. राहुल यांना पाठिंबा देणारा ठराव पंजाब काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी मांडला तर चंडीहारमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते प्रताप सिंग बाजवा यांनी ठराव मांडला.

सोनियांची तटस्थ भूमिका

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्तानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बुधवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. सूत्रांच्या मते, सोनिया गांधी निवडणुकीत तटस्थ भूमिका बजावणार आहेत. त्यांच्याकडून कोणत्याही उमेदवाराचे नाव सूचविले जाणार नाही किंवा त्यांच्याकडून कोणाला पाठिंबा दर्शविला जाणार नाही. थरूर यांच्या उमेदवारीचेही सोनिया यांनी स्वागत केले होते. पण, पाठिंबा व्यक्त केला नव्हता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा