दिल्ली पोलिसांची आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

मुंबई : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मुंबईत मोठे यश मिळाले आहे. मुंबईतील न्हवं- शेवा बंदरावर छापा टाकून एक कंटेनर जप्त केला. ज्यामध्ये कोट्यवधी रुपयांची हेरॉईन आढळले. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची किंमत तब्बल १८०० कोटी रुपये असल्याचे समजते. दिल्ली पोलिसांची ही आतापर्यंतची सर्वात मोठी जप्ती असल्याचे मानले जाते.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने काही दिवसांपूर्वी २ अफगाण नागरिकांना अटक केली होती. या दोघांनी नार्को टेररचा पर्दाफाश केला होता. त्याच्या सांगण्यावरुन स्पेशल सेलच्या पथकाने १२०० कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते. या दोन्ही परदेशी नागरिकांची बराच वेळ चौकशी केली असता, मुंबई बंदरातील कंटेनरमध्येही अंमली पदार्थ येणार असल्याचे उघड झाले.

या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे पथक दोन्ही आरोपींना घेऊन मुंबईच्या न्हावा शेवा बंदरात पोहोचले आणि तेथे छापा टाकून एका कंटेनरमधून २० टनहून अधिक हेरॉईन जप्त केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच आतापर्यंतची ही सर्वात मोठी हेरॉईन जप्ती आहे. जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत अंदाजे १८०० कोटी रुपये आहे.

स्पेशल सेलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ड्रग्जच्या संबंध नार्को टेररशी संबंधित आहेत. दिल्ली पोलिसांचे डीसीपी प्रमोद कुशवाह यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या टीममध्ये एसीपी ललित मोहन नेगी, हृदय भूषण आणि इन्स्पेक्टर विनोद बडोला यांसारख्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकाने २०-२१ या वर्षात सर्वाधिक ड्रग्ज पकडले असून त्यात सर्वाधिक प्रकरणे नार्को टेररची आहेत.

आश्चर्याची बाब म्हणजे, मुंबई बंदरात हेरॉइनने भरलेल्या कंटेनरची नार्कोटिक्स ब्युरो आणि डीआरआयच्या पथकाने बऱ्याचदा तपासणी केली. मात्र, या ड्रग्जच्या मालाबाबत ते अनभिज्ञ राहिले. पण, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्या कंटेनरमधूनच ड्रग्जची खेप जप्त केली आणि तो कंटेनर दिल्लीत नेला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा