अजित पवार यांचे सरकारला आव्हान

मुंबई, (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारच्या काळात काही तरी वेगळ्या मागण्या केल्याने वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याच्या बाहेर गेला, असा आरोप काही जण करत आहेत. असे काहीही झालेले नाही. तरीही कोणाला तशी शंका वाटत असेल तर केंद्रात व राज्यात तुमचेच सरकार आहे. सर्व तपास यंत्रणा तुमच्या हातात आहेत. या सर्वाची चौकशी करा, सत्य जनतेसमोर येईल, असे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपला दिले. ग्रामपंचायत निवडणुकांत महाविकास आघाडीलाच जास्त जागा मिळाल्याचा दावा त्यांनी केला. शिवाजीपार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी उद्धव ठाकरे यांनाच मिळावी,असेही ते म्हणाले.

उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारचे राज्यात मोठमोठे प्रकल्प यावेत, असा प्रयत्न सुरू होता. मात्र, वेगळ्या मागण्या किंवा ‘डिमांड’ केली होती म्हणून प्रकल्प गेला असे आरोप काही लोक करत आहेत.

मी उपमुख्यमंत्री असताना असे अजिबात झालेले नाही. कारण नसताना संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातआहे. जर कुणाला असे वाटत असेल, तर केंद्रात आणि राज्यात तुमचे सरकार आहे; यंत्रणा तुमच्या हातात आहेत. खुशाल चौकशी करावी; पण बेफाम आरोप करून बेरोजगारांमध्ये गैरसमज निर्माण करू नये, असे अजित पवार म्हणाले. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अमुक पक्षाला अमुक जागा मिळाल्याचे दाखविण्यात येत आहे. मात्र, ग्रामपंचायत निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर होत नसतात. महाविकास आघाडीलाच जास्त जागा मिळाल्या आहेत. ही पुढच्या निवडणुकांची रंगीत तालीम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दसरा मेळाव्यासाठी अजूनही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने प्रयत्न करावा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा