शिवसेना आक्रमक

मुंबई, (प्रतिनिधी) : शिवसेनेच्या परंपरागत दसरा मेळाव्यासाठी यंदा शिवाजी पार्क मैदान मिळणार की नाही याबाबत अजूनही अनिश्चितता असली, तरी शिवसेनेने मात्र शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. परवानगी मिळो अथवा नाही, दसर्‍याला शिवसैनिक मोठ्या संख्येने शिवाजी पार्कवर जमतील, असे शिवसेना उपनेते मिलिंद वैद्य यांनी सांगितले.

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान उपलब्ध करून घ्यावे, यासाठी 22 ऑगस्ट रोजी शिवसेनेने महापालिकेकडे अर्ज केला आहे. त्याबाबत निर्णय प्रलंबित असताना शिंदे गटानेही शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केला होता. शिवाजी पार्क मैदानाबरोबरच त्यांनी बांद्रा येथील एमएमआरडीए मैदानासाठी अर्ज केला होता व तेथे त्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवाजी पार्क मैदान परंपरेप्रमाणे आम्हाला द्यावे, असा शिवसेनेचा आग्रह आहे. परंतु, महापालिकेने यावर अजूनही निर्णय दिलेला नाही. यामुळे शिवसेनेचे उपनेते मिलिंद वैद्य यांच्यासह शिवसेना पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने काल मुंबई महापालिकेच्या जी-उत्तर कार्यालयाला धडक देऊन, आमच्या अर्जाचे काय झाले? याबाबत विचारणा केली. विधी खात्यातून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याने परवानगी देत येत नसल्याचे तेथील अधिकार्‍यांनी सांगितले. यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

’आम्हाला आता परवानगी मिळो न मिळो शिवसैनिक दसर्‍याला मोठ्या संख्येनं शिवाजी पार्कवर जमणार आहेत, असे शिवसेना उपनेते मिलिंद वैद्य यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिंदे गटाचा मेळावा बीकेसीमध्ये होणार असेल तर आम्हाला शिवाजी पार्कवर परवानगी देण्यास काय हरकत आहे? कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न येतोच कुठे? असा सवाल त्यांनी केला.

शिवसेना कार्यकर्त्यांची सरकारला भीती वाटते…

शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा होतो. पूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटायला शिवसैनिक इथे यायचे. त्यांच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी येतात. पण, त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचू नयेत म्हणून सरकारची दडपशाही सुरू आहे. ही दडपशाही आम्ही खपवून घेणार नाही. 22 ऑगस्ट रोजी दसरा मेळाव्याबाबत परवानगी अर्ज दिला आहे. पण, त्याचे उत्तर अद्याप आलेले नाही. परवानगी जर नाकारली, तर शिवसैनिक काय करेल, हे मी सांगण्याची गरज नाही. त्यासंदर्भातील आदेश उद्धव ठाकरे देतील. त्याचे आम्ही पालन करू, असे मिलिंद वैद्य यांनी सांगितले. सरकारला शिवसैनिकांची भीती वाटते, त्यामुळे आत्तापासूनच मैदानाभोवती पोलिसांची फौज उभी करण्यात आल्याचा टोला त्यांनी लगावला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा