भाजपचा दावा खोटा : पटोले

मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्याचा भाजपचा दावा धादांत खोटा आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना घवघवीत यश मिळाले असून, काँग्रेस पक्षाला 175 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाला असल्याचा दावा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणूक निकालावर भाजपचा ‘आयटी सेल’ चुकीची माहिती देत आहे. भाजपचा मोठ्या विजयाचा दावा धादांत खोटा आहे. सर्वात जास्त जागा जिंकल्याचा दावा करून भाजप स्वतःच स्वतःची पाठ थोपटवून घेत आहे. आम्ही सर्व जिल्ह्यातून माहिती घेतली असताना काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळालेले स्पष्ट दिसत आहे. काँग्रेस पक्षावर लोकांचा विश्वास आहे तो त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत दाखवून दिला आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही, असेही पटोले म्हणाले.

वेदांता फॉक्सकॉन प्रकरणी शिंदे-फडणवीस सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. गुजरात काय पाकिस्तान आहे का? असे म्हणून महाराष्ट्रातून गुजरातमध्ये प्रकल्प गेल्याचे ते समर्थन करताना दिसत आहेत. गुजरातमध्ये गुंतवणूक होत असेल, तर त्याला कोणाचाच विरोध नाही; पण महाराष्ट्रात होणारा हा प्रकल्प गुजरातच्या घशात घातला आहे. अशा प्रकारे महाराष्ट्र कमकुवत करून गुजरातच्या विकासाला हातभार लावला जात असेल, तर ते आम्ही खपवून घेणार नाही.

प्रत्येक जिल्ह्यात ‘राज्यघटना बचाव फेरी’

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रा सुरू करण्यात आली असून, या यात्रेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेप्रमाणेच राज्यघटना बचाव फेरी प्रत्येक जिल्ह्यात काढली जाणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष राजेश लिलोठीया यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा