सक्‍तीविरोधात केस कापले; हिजाबही पेटवले

तेहरान : इराणमध्ये हिजाबविरोधात महिलांच्या आंदोलनाचा उद्रेक झाला आहे. हिजाबची सक्‍ती करणार्‍या पोलिसांविरोधात महिलांनी नारेबाजी करत स्वत:चे केस कापले असून हिजाब पेटवून दिले.

महसा आमिनी (वय 22) यांनी हिजाब घालण्यास नकार दिला. तसेच इस्लामिक कायद्याचे पालन केले नाही. त्यामुळे संस्कृतीरक्षक पोलिसंनी त्यांना अटक केली होती. पोलिसांच्या मारहाणीत आणि कोमात गेल्यामुळे त्यांचा शुक्रवारी मृत्यू झाला, असा आरोप होत आहे. शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले होते. तेव्हा उपस्थित महिलांनी हिजाब फेकून दिले. तसेच इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्‍लाह अल खामेनी यांच्याविरोधात हुकूशहाला ठार करा, अशा घोषणा दिल्या. यावेळी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. सरकारी कार्यालयाकडे जाणार्‍या काही जणांना अटक केली.

इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनाचा उद्रेक

महसा आमिनी यांच्यावरील पोलिसांच्या अमानवीय कारवाईमुळे संतप्‍त झालेल्या महिलांनी आता मंगळवारी हिजाब विरोधात मोठे आंदोलन सुरू केले आहे. संस्कृतीरक्षक पोलिसांना तेथे गश्त ए इर्शाद असे संबोधले जाते. त्यांच्या विरोधात महिला आक्रमक झाल्या आहेत. संतप्‍त झालेल्या महिलांनी स्वत:चे केस कापले आणि हिजाब पेटवून दिले. महिला आणि पुरूष भेदभाव अमान्य आहे. महिलांना त्यांचे अधिकार आणि स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे, अशा सरकारविरोधी घोषणा करत त्यांनी आंदोलन केले.

सक्‍तीविरोधात केस कापले; हिजाबही पेटवले

इराणच्या पत्रकार आणि कार्यकर्त्या मसिह अलिनेदाज यांनी संतप्‍त झालेल्या महिलांची चित्रफीत ट्विटरवर प्रसारीत केली आहे. त्यात म्हटले आहे की, इराणी महिला आपला संताप केस कापून आणि हिजाब पेटवून देत व्यक्‍त करत आहेत. महसा आमिनी यांच्या क्रूर हत्त्येचा निषेध करत आहेत. वयाच्या सातव्या वर्षांपासून आम्हाला केस झाकावे लागतात. त्याशिवाय आम्हाला शाळेत जााता येत नाही किंवा नोकरीही करता येत नाही. अशा प्रकारच्या लैंगिक दुजाभावाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा