दोघांचाही पहिल्या क्रमांकाचा दावा

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर झालेल्या 16 जिल्ह्यांतल्या सहाशे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गट व महाविकास आघाडीला संमिश्र यश मिळाले आहे. भाजपाने सर्वाधिक 188 ग्रामपंचायतीत विजय मिळवला असून, राष्ट्रवादी काँग्रेसनेही 136 ग्रामपंचायतीत बाजी मारली आहे. मात्र या दोघांनीही आपणच पहिल्या क्रमांकावर असल्याचे दावे केले आहेत. काँग्रेसला 85 ग्रामपंचायतीत, शिवसेनेला 37, तर शिंदे गटाला 41 ग्रामपंचायतीत यश मिळाल्याची प्राथमिक माहिती आहे.

51 तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली. त्यातील 51 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित 547 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. राज्यात झालेले सत्तांतर व शिवसेनेतील दुफळीनंतर प्रथमच जनमताची चाचणी होत असल्याने लोकांचा कौल काय येतो ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्राथमिक माहितीनुसार या निवडणुकीत भाजपा व शिंदे गटाला अधिक जागा मिळाल्या असल्या, तरी महाविकास आघाडीतील तीन पक्षांची बेरीज त्यांच्या जवळपास आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र आपणच पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा केला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एकट्या भाजपाने तीनशेहून अधिक ग्रामपंचायतीत सत्ता मिळवल्याचा दावा केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणुका चिन्हावर होत नसल्याने भाजप वाट्टेल ते दावे करायला मोकळी असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या हे वास्तव असल्याचा दावा केला.

जनतेच्या मनातील सरकार असल्यानेच विजयाचा कौल!

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपा आणि शिवसेना युती ही एक नंबरला आहे. आम्ही जे सरकार स्थापन केले ते सर्वसामान्य जनतेच्या मनातले सरकार असल्यानेच हा कौल मिळाला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आजच्या निकालांनी भाजपा शिवसेना युतीवर जनतेने शिक्कामोर्तब केले आहे. महापालिका निवडणुकांतही हेच चित्र दिसणार आहे. पुढच्या निवडणुका देखील आम्ही एकत्रच लढविणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

कोस्टल रोडची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ग्रामपंचायत निवडणुकांत सगळ्यात पुढे एक नंबरला आमची युती आहे. आम्ही जे सरकार स्थापन केले ते सर्वसामान्य जनतेच्या मनातले सरकार आहे. त्यामुळेच लोकांचा कौल मिळाला. आम्ही चांगले काम करू. लोकांना जे हवे आहे ते देण्याचा प्रयत्न करू. त्यांनी गेल्या अडीच वर्षांत जे काम केले व आम्ही गेल्या दोन महिन्यात जे काम केले त्याची पोचपावतीच जनतेने दिली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

ग्रामपंचायत निकालांनी शिवसेना-भाजपाच्या युतीवर शिक्कामोर्तब केले आहे. तसेच तुम्ही म्हणता तसे हा शिंदे गट नसून हीच खरी शिवसेना आहे. तिकडे शिल्लकसेना आहे. मुख्यमंत्री शिंदेंची शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन हिंदुत्वाच्या विचारावर चालणारी शिवसेना आहे. आजच्या निकालांत भाजप आणि शिवसेनेच्या युतीला जनतेने पूर्णपणे स्वीकारले आहे. 550 जागांपैकी 350 पेक्षा जास्त जागा आम्हाला मिळाल्या आहेत. ही भविष्याची नांदी आहे. येणार्‍या महापालिका निवडणुकांत देखील हेच चित्र दिसणार आहे. पुढच्या निवडणुका देखील आम्ही एकत्र लढू. त्यात निश्चितच आमचा विजय होताना दिसेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

भाजपच नंबर वन : बावनकुळे

ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पार्टी – शिवसेना युतीला स्पष्ट कौल दिला असून 581 पैकी 299 ग्रामपंचायतींमध्ये युतीचे सरपंच निवडून आले आहेत, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. तर, उद्धव ठाकरे यांची शिल्लकसेना या निवडणुकीत पाचव्या क्रमांकावर गेल्याचा दावा भाजप नेते आशिष शेलार यांनी केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा