कोलकाता : बंगळुरू एफसीने मुंबई सिटी एफसीचा 2-1 असा पराभव करत ड्युरंड चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजयी बंगळुरूकडून शिवशक्ती (10वा मिनिट) आणि ब्राझीलच्या अॅलन कोस्टा (61वा मिनिट) यांनी गोल केले. मुंबई सिटीसाठी अपुइयाने सामन्यातील एकमेव गोल केला. खेळाच्या पहिल्याच मिनिटाला मुंबईला फ्री-किक मिळाली, पण खेळाच्या 10व्या मिनिटाला शिवशक्तीच्या गोलच्या जोरावर बंगळुरुने आघाडी घेतली.
उत्तरार्धातही दोन्ही संघांनी जबरदस्त खेळ दाखवला, दोन्ही संघांना अनेक संधी मिळाल्या, मात्र त्यांना गोल करण्यात यश मिळाले नाही. बंगळुरू आणि मुंबईला काही वेळाने प्रत्येकी एक गोल करण्यात यश आले असले, तरी बंगळुरू एफसीने मुंबईचा 2-1 असा पराभव करून प्रथमच विजेतेपद पटकावले. आशियातील ही सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे. या स्पर्धेचा हा 131वा हंगाम आहे.
राज्यपालांच्या कृतीने प्रेक्षक संतापले
ड्युरंड चषक 2022 चे विजेतेपद पटकावणार्या बंगळुरूचा कर्णधार सुनील छेत्री याला व्यासपीठावर बोलावून चषक दिला जात होता. यावेळी पश्चिम बंगालचे राज्यपाल ला. गणेशन हे देखील उपस्थित होते आणि खेळाडूंना चषक देत होते. चषक स्वीकारताना सुनील छेत्री गणेशन यांच्यासमोर आला. त्यानंतर गणेशन यांनी सुनील छेत्रीच्या खांद्यावर हात ठेवून त्याला समोरून दूर केले. त्यामुळे चाहते संतापले.