इमारती आणि पूल कोसळले

तायपेयी : तैवानला रविवारी भूकंपाचा दुसरा धक्‍का बसला आहे. एकापाठोपाठ एक असे 100 धक्के बसल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली असून तिमजली इमारत कोसळली. त्यामध्ये अनेकजण अडकल्याची भीती व्यक्‍त होत आहे. तसेच एक पूल पडला आहे. दरम्यान, जपानने त्सनामीचा इशारा दिला आहे. गेल्या 24 तासांत तैवानला तीन भूकंपाचे मोठे हादरे बसल्याचे वृत्त आहे.

शनिवारी तैवानला 6.8 रिश्टर स्केलचा, तर रविवारी 7.2 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्‍का बसला. देशाच्या आग्‍नेय भागात हे धक्के सलग दुसर्‍या दिवशी बसले. ढिगार्‍याखाली चार जण अडकल्याचे प्राथमिक वृत्त होते. तसेच कोणीही जखमी झालेले नव्हते. उत्तरेकडे चिशांग शहरात भूकंपाचा केंंद्रबिंदू 7 किलोमीटर खोलीवर होता. युली शहरात एक तीनमजली इमारत पत्त्याच्या बंगल्यापमाणे कोसळली. तेथे एक मॉल होता. या इमारतीचा 70 वर्षीय मालक व त्याची पत्नी थोडक्यात बचावले. दुसरी 39 वर्षीय महिला आणि तिच्या 5 वर्षांच्या मुलीला ढिगार्‍याखालून बाहेर काढण्यास वेळ लागला. इमारती कोसळताना विजेच्या तारा पडल्या. त्यामुळे सुमारे 7 हजार घरांचा वीजपुरवठा खंडित झाला. जलवाहिन्या तुटल्या. दुपदरी पूल कोसळला. तेव्हा तीन व्यक्‍ती आणि वाहने पुलावरून फेकली गेली. युली शहरातील पर्वतीय भागात पर्यटनासाठी आलेले सुमारे 400 जण अडकल्याचे वृत्त आहे. या भागातील वीजपुरवठा व मोबाईल सेवा ठप्प झाली आहे. रुळावरून रेल्वे घसरल्या असून, रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा