वेदांता-फॉक्सकॉन

मुंबई, (प्रतिनिधी) : आमचे सरकार येण्याआधीच फॉक्सकॉनचा निर्णय झाला होता. तरीही आम्ही हा प्रकल्प महाराष्ट्रात राहावा म्हणून निकराचे प्रयत्न केले; मात्र ज्यांनी दोन वर्षे काहीच केले नाही ते आमच्याकडे बोट दाखवून आम्हाला शहाणपणा शिकवत आहेत, अशी टीका उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी आघाडीच्या नेत्यांवर केली. उद्योगात अग्रेसर असलेला महाराष्ट्र आघाडी सरकारच्या काळात पाचव्या-सहाव्या क्रमांकावर गेल्याचा आरोप करताना, पुढच्या दोन वर्षांत राज्याला गुजरातच्या पुढे नेऊन दाखवू, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात होणारा वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्याने राजकारण तापले तेव्हा उपमुख्य मंत्री फडणवीस एका कार्यक्रमासाठी रशियाला गेले होते. काल मुंबईत परतल्यानंतर त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्त्युत्तर देताना प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जायला यापूर्वीच्या आघाडी सरकारचा नाकर्तेपणाच कारणीभूत असल्याचा आरोप केला. आमचे सरकार येण्याआधीच फॉक्सकॉनचा निर्णय झाला होता. तरीही हा प्रकल्प महाराष्ट्रात राहावा म्हणून आम्ही निकराचे प्रयत्न केले. उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्याच दिवशी मी एमआयडीसीच्या अधिकार्‍यांना बोलावून वेदांताबाबत चौकशी केली. त्यांचा गुजरातकडे कल असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे लगेच मी व मुख्य मंत्र्यांनी त्यांच्याशी संपर्क करून चर्चा केली. आम्ही दोघांनी त्यांच्याशी चर्चा केली. वेदांतांचे प्रमुख अनिल अग्रवाल यांनाही बोललो. चांगले पॅकेज त्यांना ऑफर केले होते. मात्र त्यांनी आमचा निर्णय झाला असल्याचे सांगितले; परंतु पुढच्या काळात यापेक्षा जास्त गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रात करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

महाराष्ट्र गुजरातच्या पुढेच राहील

महाराष्ट्राचा औद्योगिक क्षेत्रात पहिला क्रमांक होता; मात्र मागच्या दोन वर्षात आपण पहिल्या क्रमांकावरून पाचव्या-सहाव्या क्रमांकावर फेकले गेलो. गुजरातला नावे ठेवून आणि त्यांच्या विरोधात भाषण करून आपण पहिल्या क्रमांकावर जाणार नाही. त्यासाठी तशी धोरणे आखावी लागतील. गुजरात आपले शेजारी राज्य असले, तरी निकोप स्पर्धा करून महाराष्ट्राला पुढील दोन वर्षांत पहिल्या क्रमांकावर आणू, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

रिफायनरीला का विरोध केला?

महाराष्ट्रात 3 लाख 50 हजार कोटींची गुंतवणूक होऊन देशातील सर्वांत मोठी रिफायनरी येणार होती. या प्रकल्पातून आपण पाच लाख नागरिकांना रोजगार देऊ शकलो असतो. गुजरातच्या विकासात जामनगरच्या रिफायनरीचा आणि मुंद्रा पोर्टचा मोठा वाटा आहे. त्या रिफायनरीपेक्षा चौपट मोठी रिफायनरी महाराष्ट्रात तयार झाली असती, तर महाराष्ट्र पुढचे दहा वर्षे पुढे गेला असता. या रिफायनरीला विरोध केल्याबद्दल फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली. बुलेट ट्रेनचे काम बंद केले. 20 हजार कोटींची गुंतवणूक असलेल्या मेट्रो प्रकल्पाचे काम थांबवले. मुंद्रा पोर्टपेक्षा मोठा आणि जगातला सगळ्यात चांगला पोर्ट वाढवणला होणार होता. त्यालाही विरोध केला. काहीच होऊ देणार नाही हे धोरण असेल ,तर आपण गुजरातच्या पुढे कसे जाणार? असा सवाल फडणवीस यांनी केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा