औरंगाबादमध्येच मंगलप्रभात लोढांची मोठी घोषणा

औरंगाबाद : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्याचा शिंदे सरकारचा निर्णय ताजा असतानाच आता जिल्ह्यातील महत्त्वाच्या किल्ल्याचेही नामांतर केले जाणार आहे. औरंगाबादमधील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या सुप्रसिद्ध दौलताबाद किल्ल्याचे नाव बदलण्यात येणार आहे. या किल्ल्याला पुन्हा एकदा देवगिरी किल्ला असे नाव देण्यात येईल, अशी घोषणा भाजप नेते आणि पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या महारोजगार मेळाव्यात लोढा बोलत होते. देवगिरीचे नाव बदलून दौलताबाद करण्यात आले होते. आता पुढील हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनापर्यंत किल्ल्याचे नाव बदलून पुन्हा देवगिरी किल्ला असे नामकरण करण्यात येईल, अशी घोषणा मंगलप्रभात लोढा यांनी केली. आज सकाळी लोढा यांनी किल्याला भेट दिली होती.

देवगिरी किल्ल्याला २८ नोव्हेंबर १९५१ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली होती. औरंगाबादचा दौलताबाद किल्ला हे यापैकी एक आश्चर्य ठरले आहे. हा पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध किल्ला आहे.

विशेष म्हणजे या गडावरील मेंढातोफ अतिशय अद्भुत आहे. या तोफेची खासियत म्हणजे एका माऱ्यात एखादा गड किंवा किल्ला उद्ध्वस्त करण्याची क्षमता या तोफेत असल्याची माहिती आहे. ती तोफ पंचधातूंनी निर्माण केली आहे.

रामदेवराव यादवांपासून निझामशाहीपर्यंत अनेक राजांचे कर्तृत्व पाहिलेला हा किल्ला औरंगाबादची शान आहे. औरंगाबादपासून सुमारे १५ किलोमीटरवर असलेल्या या किल्ल्याचे मूळ नाव देवगिरीच होते. देवगिरी या नावामागेही एक दंतकथा आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा