कायदेशीर सल्ला : अ‍ॅड. विलास सूर्यकांत अत्रे
9850978450

प्रश्‍न – आमच्या घरामध्ये आई-वडील, मी, माझी पत्नी आणि माझी मुले एकत्र राहत आहोत. आम्ही राहत असलेली सदनिका माझ्या वडिलांची खरेदी मालकीची आहे. मला मोठी बहीण असून, तिचे लग्न झालेले आहे. ती तिच्या मुलाबाळांसह सासरी सुखाने नांदत आहे. माझ्या वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या लेकीच्या लग्नात आणि लग्नानंतर तिच्यासाठी वेळोवेळी भरपूर खर्च केलेला असून, दागदागिने व रोख रकमाही तिला दिलेल्या आहेत. माझ्या वडिलांना त्यांची सदनिका म्हणजे आमचे राहते घर हे मला देणेचे आहे. मात्र त्यात तिच्या हयातीपर्यंत राहण्याचे हक्कही त्यात ठेवायचा आहे. काही जणांच्या मतानुसार वडिलांना त्यांच्या इच्छेप्रमाणे मृत्युपत्र बनवण्यास सांगावे. ते कमी खर्चाचे होईल; तर काही जणांच्या मतानुसार वडिलांकडून मी राहती सदनिका ही बक्षीसपत्राने घ्यावी. ते काम खर्चाचे असले, तरी दूरचा विचार करता ते फायदेशीर असणार आहे, असे त्यांचे मत आहे. योग्य ते मार्गदर्शन करा.

उत्तर – तुमच्या वडिलांची सदनिकेबाबत तुमच्या आईला तिच्या आयुष्यभर राहता यावे या त्यांच्या इच्छेबाबत नंतर सांगतो. प्रथमतः ही सदनिका तुमच्या नावे होण्याच्या संबंधात सांगितलेल्या दोन तरतुदींबाबत विचार करू. तुमच्या वडिलांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे मृत्युपत्र करून ठेवणे आणि सदनिका तुम्हास देण्याबाबत तरतूद करणे किंवा बक्षीसपत्राने ही सदनिका तुम्हाला बक्षीस द्यावी, या दोनही व्यवहारांचा अंतिम परिणाम वरवर पाहता सारखा वाटतो. मात्र त्यातील बारकावे समजून घेतल्यानंतर, या दोनही तरतुदींमधील फरक जमीन-अस्मानाइतका आहे. पहिल्या प्रकारात भविष्यात तुम्हाला अस्मानही दाखवले जाऊ शकते; तर दुसर्‍या प्रकारात तुम्ही तुम्हाला मिळणार्‍या सदनिकेसह तुम्ही जमिनीवर राहू शकता. या दोन्ही गोष्टींसाठी वेगवेगळे कायदे आहेत.

मृत्युपत्रासाठी भारतीय वारसा कायदा असून, बक्षीसपत्रासाठी मिळकतीच्या हस्तांतरणाचा कायदा आहे. हे दोन कायदे आहेत. यातील तरतुदी वेगवेगळ्या आहेत. कोणताही दस्त हा निष्पादित करावा लागतो. म्हणजे तो दस्त लिहिणारा किंवा लिहून देणारा किंवा लिहून ठेवणारा याने त्या दस्ताचे स्वरूप समजावून घेऊन त्यात काय लिहिले आहे, त्यातील अटी-शर्ती काय आहेत हे जाणून घेऊन, थोडक्यात दस्त वाचून घेऊन किंवा दुसर्‍याकडून वाचून घेऊन त्यावर सही करणे, म्हणजे दस्त निष्पादित करणे होय.

वरील दोन्ही दस्तांना ते निष्पादित केल्यानंतर दोन अटेस्टिंग विटनेस म्हणजे प्रमाणित साक्षीदार असणे कायद्याने बंधनकारक आहे. प्रमाणित साक्षीदार म्हणजे ज्या व्यक्तीने दस्त निष्पादित केलेला आहे, त्याने असा दस्त साक्षीदारासमोर निष्पादित करणे किंवा आपण तो निष्पादित केला आहे, असे सांगणे जरुरीचे असते आणि त्याच्या साक्षीसाठी प्रमाणित साक्षीदाराने अशा व्यक्तीसमोर स्वतः सही करणे अपेक्षित असते. मृतुपत्राबाबत ज्या व्यक्तीने हे मृत्युपत्र केलेले आहे, त्याच्या मृत्यूनंतरच मृत्युपत्रात दिलेल्या मिळकतीबाबत अधिकार सुरू होतो. त्यासाठी कित्येक वेळा दिवाणी न्यायालयाकडून मृत्युपत्राच्या सत्यतेबाबत दाखलाही मिळवावा लागतो. म्हणजेच मृत्युपत्राद्वारे एखाद्याने मिळकत दिलेली असेल, तर ती मिळकत अशा व्यक्तीच्या मालकीची होण्यासाठी बराच कालावधी लागत असतो. या मृत्युपत्राला काही व्यक्तींकडून हरकतही घेतली जाणे शक्य असते. असे झाले तर ते मृत्युपत्र आणि ती मिळकत दिवाणी कोर्टाचा वाद विषय होऊ शकते आणि दीर्घ काळ अशी व्यक्ती त्याला मिळणार्‍या मिळकतीपासून वंचित राहू शकते. प्रसंगी या न्यायालयाच्या वादात निर्णय विरुद्ध गेला, तर तो कायमचाच अशा मिळकतीपासून वंचित राहतो. माणसाचे मन अतिशय चंचल असते आणि मृत्युपत्राबाबत, नवीन मृत्युपत्र केले, की आधीचे मृत्युपत्र आपोआप रद्द होत असते. आज एखाद्याला मिळकत द्यावीशी वाटली आणि तसे मृत्युपत्र करून ठेवले, तर अजून काही दिवसांनी, वर्षांनी त्या व्यक्तीचे मतही बदलू शकते. त्यामुळे त्याने पहिले केलेले मृत्युपत्र त्याच्यावर बंधनकारक नसते आणि म्हणून या धोक्याचा विचार करावा लागतो.

थोडक्यात मृत्युपत्रामुळे मिळकतीचा मालक होण्यात बरेच अडथळे आहेत आणि कालावधीही खूप आहे. बक्षीसपत्राने बक्षीस दिलेली मिळकत ही ज्या क्षणी बक्षीसपत्र लिहून देणार्‍याने निष्पादित केलेले असते, त्या क्षणापासून ज्याला ती मिळकत बक्षीस मिळते, त्या मिळकतीचा तो मालक होतो.

स्थावर मिळकतीच्या बक्षीसपत्रासाठी प्रमाणित साक्षीदार लागतातच आणि अशी मिळकत कितीही रुपयांची असली, तरी ते बक्षीसपत्र कायद्याने नोंदवावेच लागते. स्थावर मिळकतीबाबत जर बक्षीसपत्र लेखी केले, तर तेही नोंदवावे लागते. बक्षीसपत्राला हरकत घेतली जाऊ शकते का, असा प्रश्‍न विचारला तर बक्षीस देणार्‍याला आत्यंतिक मर्यादित कारणासाठी अशी हरकत घेता येऊ शकते. त्रयस्थ व्यक्ती अशी हरकत घेऊ शकेल. अशी कुणीही हरकत घेतली, तरी बक्षीस घेणार्‍याला मिळालेला मालकी हक्क लगेचच रद्द होत नाही. त्यासाठी हरकत घेणार्‍याला दिवाणी न्यायालयाचाच आधार घ्यावा लागतो आणि अशा वेळी हे बक्षीसपत्र चुकीचे आहे, खोटे आहे, बेकायदेशीर आहे, हे सिद्ध करण्याची जबाबदारी हरकत घेणार्‍यावर असते. मृत्युपत्राबाबत मात्र नेमकी उलटी परिस्थिती असते. मृत्युपत्रात ही जबाबदारी ज्याला मिळकत मिळालेली आहे, अशा व्यक्तीवर येते. आजमितीस जवळच्या नातेसंबंंधामध्ये बक्षीसपत्रासाठी मुद्रांकशुल्कामध्ये जर बक्षीसपत्र निवासी सदनिकेचे किंवा शेतजमिनीचे असेल, तर मोठी सवलत दिलेली आहे. आजमितीस यासाठी मुद्रांकशुल्क रुपये दोनशे आहे. आजमितीस यासाठी मुद्रांकशुल्क रुपये दोनशे आहे. आणि नोंदणी फी रुपये दोनशे आहे. तेव्हा बक्षीसपत्राचा मार्ग हा सोयीचा आहे.

आईचे जे हक्क राखून ठेवायचे आहेत त्याबाबतच्या सर्व अटी-शर्ती या दोन्ही दस्तांमध्ये लिहून ठेवणार्‍याला घालता येतात आणि असे सशर्त मृत्युपत्रही होऊ शकते किंवा बक्षीसपत्रही होऊ शकते.

मात्र काळजी घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मृत्युपत्रात स्त्रीसाठी असा आयुष्यभराचा अधिकार राखून ठेवताना तो अधिकार तिच्या पोटगीसाठी ठेवला आहे असे नमूद झाल्यास, ती मिळकत त्या स्त्रीला पूर्ण मालकीहक्क मिळते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा