फेरफटका : प्रा. विकास देशपांडे

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रव्यापी पातळीवरील मेळावा नुकताच राजधानी दिल्लीत पार पडला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या भाषणातून भाजप विरुद्ध संयुक्त आघाडी करून केंद्रात सत्तांतर घडवून आणता येईल, असा विश्‍वास त्यात व्यक्त केला. केंद्र सरकारच्या विफलतेवर हल्ला करताना पवार म्हणाले, ‘भारताचे डावपेचात्मक हितसंबंध जपण्यात भाजप अपयशी ठरत आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेवर चीनने भारतीय क्षेत्रात घुसखोरी केली. त्याबाबत प्रभावी प्रतिकारवाई न करता ‘भारत जागतिक पातळीवर पाचव्या क्रमांकाचा देश झाला आहे’, अशी भूमिका केंद्र सरकारकडून मांडली जात आहे.’ मोदी सरकारवर अशी बोचरी टीका करताना पवार यांनी समविचारी पक्षांबरोबर हातमिळवणी करून भाजपला पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. मोठ्या कालावधीनंतर राष्ट्रवादीचे अधिवेशन महाराष्ट्राबाहेर राजधानी दिल्लीत पार पडले. महाराष्ट्राबाहेरच्या कार्यकर्त्यांची लक्षणीय हजेरी डोळ्यांत भरणारी होती. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पवार हे पंतप्रधान पदाचे दावेदार नाहीत व नव्हते; मात्र त्यांच्याबद्दल संपूर्ण देशात आदराची भावना आहे, असे म्हटले आहे.

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी काँग्रेसला ‘सत्य स्थिती’ ओळखून रणनीती ठरविण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, की काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींची संख्या देशात तुलनेने अधिक असली, तरी ज्या राज्यांमध्ये स्थानिक पातळीवरील पक्षांचे प्राबल्य आहे, त्या राज्यांमध्ये स्थानिक पक्षांना झुकते माप दिले पाहिजे. बिहारमध्ये भविष्यात राष्ट्रीय जनता दलास ‘वाहनचालकाची’ भूमिका देणे आवश्यक आहे. सर्व बिगर भाजप पक्षांना एकत्र आणणारे ‘बिहार मॉडेल’ देशपातळीवर मार्गदर्शक ठरू शकते, असेही त्यांनी सूचित केले आहे! बिहारमध्ये सर्व (बिगर भाजप) पक्ष एकत्र आल्यामुळे, भारतीय जनता पक्ष एकाकी पडली आहे. बिहारप्रमाणेच परिस्थिती राष्ट्रीय पातळीवर निर्माण करता येईल, असे तेजस्वी यादव यांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय जनता दलास राष्ट्रीय पातळीवर अधिक गतिशील भूमिका घ्यावयाची इच्छा आहे, ही गोष्ट यामुळे आता स्पष्ट झाली आहे.

एकूण पाहता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जसजशी जवळ येईल, तशी राष्ट्रीय राजकारणातील भाजप विरोधाची धार अधिक तीव्र होत जाईल, असा अंदाज आहे; मात्र उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने काहीसा वेगळा पवित्रा घेतला आहे, असे दिसते. या पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी उत्तर प्रदेशात
समाजवादी पक्ष काँग्रेस किंवा बहुजन समाज पक्ष यांच्याशी युती करणार नाही असे स्पष्ट केले असून, आपला पक्ष संघटनात्मकदृष्ट्या अधिक बळकट करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे उत्तर भारतात भाजप विरोधाचे गणित सहजासहजी सुटणार नसल्याचे संकेतच मिळाले आहेत.

राजस्तान व छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेवर आहे. मध्य प्रदेश व कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्येही काँग्रेसला बर्‍यापैकी यश मिळाले होते. मध्य प्रदेशात काँग्रेस नेते कमलनाथ यांनी सरकारही स्थापन केले होते; परंतु ज्योतिरादित्यांच्या बंडामुळे ते काही महिन्यांतच कोसळले,तर कर्नाटकात जनता दल (एस्)च्या कुमार स्वामींना मुख्यमंत्रिपद देऊनसुद्धा काँग्रेस-जनता दल (से.) युतीचे सरकार काही महिन्यांतच कोसळले. केरळमध्येही मार्क्सवादी पक्षाने बाजी मारल्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र दक्षिणेकडील राज्यांमध्ये काँग्रेसची स्थिती काही अगदीच केविलवाणी आहे, असे म्हणता येणार नाही.

देशभरात वाढत असलेली महागाई, बेकारी व अन्य समस्यांच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रातील भाजप सरकारची कामगिरी फारशी समाधानकारक नाही असे दिसते. जनतेस लागणार्‍या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने होणारी वाढ व चलनफुगवटा यांच्यावर नियंत्रण स्थापित करण्यास केंद्र सरकारचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. औद्योगिक उत्पादनाच्या आघाडीवर जुलै महिन्यात दिसून आलेली जवळपास अडीच टक्के घट व अन्नधान्याच्या किमतीत दिसून येत असलेली वाढ, यांच्या पार्श्‍वभूमीवर सरकारची कामगिरी अतिशय सुमार आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेस मिळणार्‍या जोरदार प्रतिसादामुळे काँग्रेस पक्षाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश ‘भारत जोडो’ला मिळणार्‍या प्रतिसादावर भाष्य करताना म्हणाले, की यात्रेमुळे भारतीय जनता पक्षामध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच नैराश्यापोटी भाजपकडून राहुल गांधी परिधान करत असलेल्या ‘टी शर्ट’वर टीका करण्यात येत आहे. ही यात्रा पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’प्रमाणे एकसूरी नाही, तर जनतेच्या मनात असलेल्या असंतोषातून जे विविध आवाज उमटत आहेत, ते ऐकून घेण्यासाठी आहे. काँग्रेसचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्या म्हणण्यानुसार यात्रेस मिळत असलेले प्रतिसादात्मक यश अपेक्षेहूनही अधिक मोठे आहे !

1962 पासून इंच इंच लढविल्या गेलेल्या भारत-चीन सीमेवर मंगळवार दि. 13 सप्टेंबर रोजी सकारात्मक म्हणता येईल अशी घटना झाली. या दोन्ही देशांनी पी. पी. म्हणजे पेट्रोलिंग पॉईंटपासून परस्पर सहमतीने आपले सैन्य माघारी घेतले. भारत-चीन संबंधांत ही सकारात्मकता स्थायी राहील, अशी आशा आहे !

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा