भरपाईसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव

पुणे : जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आठ तालुक्यांमध्ये 65 मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील साडेपाच हजार हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले असून 83 घरांची पडझड झाली आहे. याशिवाय एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून रस्ते, बंधारे वाहून गेले आहेत. तसेच नऊ जनावरांच्या मृत्यूची नोंद झाली असून तब्बल 20 हजार कोंबड्या दगावल्या आहेत. या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून, नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील बारामती तालुक्यात 1 ते 8 सप्टेंबर या कालावधीत 41 घरांची पडझड झाली असून दोन शेळ्या, एक बोकड, आठ हजार कोंबड्या दगावल्या आहेत. तसेच, 102 हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. तसेच मोरगावमधील खटकळी ओढ्यावरील बंधारा वाहून गेला आहे. जुन्नर तालुक्यात सहा घरांची पडझड झाली असून सोमतवाडी येथे पाच हजार कोंबड्या, ओतूर येथे 6600 आणि पिंपरी पेंढार येथे 1275 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. वेल्हा तालुक्यात 26 घरांची पडझड झाली असून एक जनावर दगावले आहे. खेड तालुक्यात तीन घरांची पडझड झाली असून, पुरंदर तालुक्यात सात घरांचे नुकसान झाले आहे. तसेच तीन शेळ्या, दोन जनावरे आणि 4000 कोंबड्या दगावल्या आहेत. या ठिकाणी 107 हेक्टर, तर दौंड तालुक्यात 152 हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

जिल्ह्यात 1, 6 आणि 7 सप्टेंबर या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. जुन्नर तालुक्यातील आठ मंडळे, आंबेगाव, दौंड प्रत्येकी एक मंडळ, पुरंदर आणि मावळ प्रत्येकी तीन मंडळे, खेड सहा मंडळे, बारामती एक, तर इंदापूर दोन मंडळ अशा एकूण 100 मंडळांपैकी 25 मंडळांमध्ये जास्त पाऊस झाला आहे. 1 ते 7 सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 182 घरांचे नुकसान झाले असून दहा घरे पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच 5314 हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून, लवकरच राज्य सरकारकडे भरपाईसाठी प्रस्ताव पाठविण्यात येईल.

  • संजय तेली, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा