धारावी : दूधामध्ये अशुद्ध पाणी मिसळून त्याची विक्री करणाऱ्या सहा जणांना गुन्हे शाखेच्या नियंत्रण कक्षाने गुरूवारी अटक केली. आरोपींकडून एक हजार लिटरहून अधिक भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले.धारावी येथील संत कबीर मार्गाजवळीत गोपाळनगर येथे अमुल, गोकूळ अशा नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये अशुद्ध पाणी भरून त्यांची विक्री करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या नियंत्रण कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील व त्यांच्या पथकाला मिळाली होती.

त्यानुसार गुरूवारी पोलीस पथकाने छापा मारला. येथील एका घरात दुधाच्या पिशव्या, भेसळयुक्त दुधाने भरलेल्या प्लास्टिकच्या बदल्या, मेणबत्त्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या, नरसाळे आदी सापडले. पोलिसंनी तेथून १,०१० लिटर दूध जप्त केले आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी शाहू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सहा जणांना अटक केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा