कास पठारावर पीएमपीच्या ई-बस उपलब्ध करून देण्याच्या निर्णयावर टिकेची झोड

  • पुणे : पुणे शहराची जिवनवाहीनी असलेल्या ‘पीएमपीएमएल‘बसमध्ये होणारी तुडुंब गर्दी आणि बसच्या दारामध्ये लोंबकळणारे विद्यार्थी हे चित्र नित्याचे आहे. त्यामुळे शहरातील प्रवाशांना गरजेनुसार सक्षम बससेवा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. परंतु असे असताना पीएमपीएमएलकडून मात्र, पर्यटनासाठी सातार्‍यातील कास पठारावर जाणार्‍या नागरिकांच्या सेवेसाठी ई-बस उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू आहेत. भाजपच्या एका नेत्याने यासाठी पीएमपी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. पीएमपीएमएलच्या या निर्णयावर पुण्यातील नागरिकांकडून चांगलीच टिकेची झोड उडवली जात आहे. ’घरातले उपाशी अन् बाहेरच्यांना पंचपक्‍वन्नाचे जेवन’ अशा शब्दात पुणेकरांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
    कास पठारावरील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी जाणार्‍या नागरिकांसाठी सातार्‍यातील गणेशखिंड ते कास पठारसाठी बससेवा उपलब्ध केली जाणार आहे. त्यासाठी पीएमपीएमएलकडून ई-बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात काही दिवसांपूर्वी पीएमपीएमएलच्या अधिकार्‍यांनी कास पठाराची पाहणी केली होती. त्यानंतर पीएमपीएमएलकडून बुधवार (दि.14) आणि गुरूवार (दि.15) असे सलग दोन दिवस सातार्‍यातील गणेशखिंड ते कास पठार या 13 किलोमिटरच्या अंतरावर ई-बसची चाचणी घेतली आहे. ही चाचणी यशस्वी झाली असून लवकर या मार्गावर पीएमपीएमएलकडून बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या ई-बस चार्ज करण्यासाठी सातार्‍यातील कोविड सेंटरच्या जागेत चार्जरदेखील बसवण्यात येणार आहे. सुरूवातीच्या काळात चार ते पाच ई-बसच्या माध्यमातून पर्यटकांना सेवा दिली जाणार आहे. त्यानंतर गरजेनुसार बसच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे पीएमपीएमएल प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अगोदर पुणे-पिंपरीच्या प्रवाशांना सक्षम बससेवा उपलब्ध करून द्या
पीएमपीएमएलकडून सातार्‍यातील पर्यटकांसाठी आपल्या कक्षाबाहेर जाऊन दिली जाणारी सेवा बेकायदेशीर आहे. शहरातील नागरिकांना दररोज गर्दीतून तसेच बसच्या दरवाजात लोंबकाळून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अगोदर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी सक्षम बससेवा उपलब्ध करून देण्यावर भर देणे गरजेचे आहे. असे असताना पीएमपीएमएलकडून कास पठारावरील पर्यटकांसाठी ई-बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय म्हणजे घरातली मानसे उपाशी आणि बाहेरच्यांना पंचपक्‍वान्न असाच दिसत असल्याचे पीएमपी प्रवाशी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी यांनी सांगितले.

सातार्‍यातील गणेशखिंड ते कास पठार या मार्गावर सलग दोन दिवस ई-बसची चाचणी घेण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वी झाली असून सुरूवातीच्या काळात चार ते पाच बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.  
- दत्तात्रेय झेंडे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा