सवलती कोणाच्या पैशातून देणार?

गुजरात विधानसभेच्या आगामी निवडणुकीत काही तरी कामगिरी करून दाखविण्याच्या दृष्टीने आम आदमी पक्ष गांभीर्याने पावले टाकीत असल्याचे दिसून येते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल वरचेवर गुजरातला जात आहेत आणि मतदारांना आश्वासने देत आहेत. जनतेला विनामूल्य वीजपुरवठा केला जाईल, बेरोजगारांना भत्ता दिला जाईल आणि महिलांना विद्यावेतन दिले जाईल, असे आश्वासन केजरीवाल यांनी दिले आहे. इतकेच नव्हे, तर ग्रामीण सरपंचांना निश्चित स्वरूपाचे वेतन देतानाच ग्रामपंचायतींकडे निधी वर्ग केला जाईल, असेही केजरीवाल यांनी गुजराती जनतेला सांगितले आहे. या आश्वासनांचे मतांमध्ये रूपांतर होते की नाही किंवा कितपत होते ते नजीकच्या काळात दिसेलच. अशा सवलती देण्यास पंतप्रधानांचा तीव्र विरोध असूनही ‘आप’ पक्षाने पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्याच राज्यात असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘आप’ने यापूर्वी दोन राज्ये जिंकून आता गुजरातवर लक्ष केंद्रित केले आहे.

अनिल रा. तोरणे, (तळेगाव दाभाडे)

दुर्भाग्यपूर्ण आत्महत्या

पुण्यातील फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये शिकणार्‍या दोन विद्यार्थ्यांनी महिनाभरात आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे. चित्रपट व दूरदर्शन माध्यमातून कला, संगीत, नाट्य, दिग्दर्शन, अभिनय, कथा, पटकथा, नेपथ्य आदी विविध प्रकारचे प्रशिक्षण घेऊन झगमगत्या दुनियेत पाऊल टाकण्यासाठी सरसावलेले 25 ते तिशीतील तरुण एकदम टोकाचा निर्णय घेऊन आपले जीवन अचानक संपवतात, हे खूप मोठे दुर्भाग्यपूर्ण आहे. आपल्याबरोबरच आपल्या आई-वडील आणि पूर्ण कुटुंबाच्या स्वप्नांची राखरांगोळी करतात, हे का बरे घडत असेल? याचा विचार कोण करणार? एकीकडे स्वतःच्या स्नेहीजनांपासून दूर, मित्र परिवार इ.शी संवाद, सहभागिता नाही. दुसरीकडे एफटीआयआय. प्रशासनाची हतबलता! तिथे वर्षभरापासून पूर्णवेळ संचालकच नाही, याची गंभीर नोंद केंद्र सरकारने घ्यायला पाहिजे. देशातील नाट्य, चित्रपट व कला क्षेत्र कित्येक दिग्गजांनी व्यापलेले असताना संचालक न मिळणे हे आश्चर्यकारक आहे.

डॉ. सुनील भंडगे, आनंदनगर, पुणे

सीएनजी गॅसचे दर कमी करा

रिक्षा हे प्रवाशांचे साधन आहे. सी.एन.जी. गॅसचे दर वाढल्यामुळे रिक्षाचालकांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. बँकेतून रिक्षा कर्ज काढून घेतल्यामुळे बँकेचे कर्ज महागाईमुळे देऊ शकत नाही. रिक्षाचालकांचे घर संसार रिक्षागाड्यावर अवलंबून आहेत. सी.एन.जी. गॅस वाढीमुळे रिक्षाचे भाडेसुद्धा वाढलेले आहे. सी.एन.जी. नॅचरल गॅस दरात कपात करावी, जेणेकरून प्रवाशांना रिक्षाभाडे परवडेल. प्रशासनाने सीएनजी गॅस दरवाढ कमी करण्याची उपाययोजना करावी.

अनिल शिंदे, पुणे.

भाजपची फूस

महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाने केलेले बंड केवळ सत्ता प्राप्तीसाठीच होते हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. विश्वासघाताने म्हणा किंवा पाठीत खंजीर खुपसून म्हणा सत्ता मिळवली इथपर्यंत ठीक; परंतु शिवसेना आणि तिच्या चिन्हावर हक्क सांगणे म्हणजे अतिच झाले! या सगळ्याला भाजपचीच फूस आहे! तत्त्व, विचार, नीती आणि हिंदुत्व ही केवळ बकवास असून या पाठीमागे केवळ सत्तेचाच हव्यास आहे! या अनितीच्या राजकारणामुळे भविष्यात शिंदे गटाची अवस्था ’धोबी का कुत्ता न घर का न घाट का!’अशी झाल्याशिवाय राहणार नाही!

श्रीकांत मा. जाधव, अतीत (जि.सातारा)

नैसर्गिक आपत्तीतही अतिरेक्यांना मदत

पाकिस्तानला महापुराने मोठा तडाखा दिला आहे. पाकिस्तानचा एक तृतीयांश भूभाग जलमय झाला असून, या पावसात 1 हजारांहून लोक मृत्युमुखी पडले. इतकी मोठी नैसर्गिक आपत्ती येऊनही पाकिस्तानला जगातून म्हणावी तशी मदत मिळत नाही. या आर्थिक आपत्तीतून केवळ चीनने पाकिस्तानला मदत केली आहे. वास्तविक कोणत्याही देशात नैसर्गिक आपत्ती आली की त्या देशात इतर देशांकडून मदतीचा ओघ सुरू होतो; मात्र पाकिस्तनाला अजूनही म्हणावी तशी मदत का मिळाली नाही. याला पाकिस्तानच जबाबदार आहे. आजवर अनेक देशांनी पाकिस्तानला मदत केली. मात्र, ती मदत जनतेच्या कल्याणासाठी वापरण्याऐवजी पाकिस्तानने दहशतवाद पोसण्यासाठी वापरली. आताही इतकी मोठी आपत्ती येऊनही पाक तेथील नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करायचे सोडून काश्मीर खोर्‍यात अतिरेक्यांना मदत करीत आहे.

श्याम ठाणेदार, दौंड, जिल्हा पुणे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा