मुंबई वार्तापत्र : अभय देशपांडे

मुंबई शिवसेनामुक्त?

केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे चाणक्य अमित शाह यांनी मागच्या आठवड्यात मुंबईचा दौरा करून महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाढवला. शिवसेनेवर विश्वासघाताचा आरोप करताना, आगामी निवडणुकीत त्यांना ’जमीन’ दाखवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेनेही हे आव्हान स्वीकारताना भाजपला ’आस्मान’ दाखवण्याचा विडा उचलला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई शिवसेनामुक्त करण्याचे भाजपचे स्वप्न पूर्ण होणार की ही भाषा ’बुमरँग’ होणार ? याचा फैसला मुंबईकर करतील; पण ही लढाई अतिशय रंगतदार होणार एवढे मात्र नक्की.

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेच्या भूमिकेमुळे भाजपला महाराष्ट्राची सत्ता गमवावी लागली. कै. वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्षे मुख्यमंत्रिपद भूषवण्याचा विक्रम करणार्‍या देवेंद्र फडणवीस यांच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावला गेला. अजित पवार यांच्या मदतीने सत्ता काबीज करण्याचा प्रयत्नही फसला. पुन्हा सत्तेवर येण्याची सुतराम शक्यता नसल्याने दोन काँग्रेसला शिवसेनेच्या भूमिकेमुळे अचानक सत्तेची ‘लॉटरी’ लागली. महाराष्ट्रात हे सगळे महाभारत सुरु असताना आधुनिक चाणक्य म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इकडे ढुंकूनही बघितले नाही.

महाराष्ट्रापेक्षा अधिक प्रतिकूल परिस्थिती असूनही हरयाणात पक्षाची सत्ता कायम ठेवणार्‍या अमित शाह यांनी यांची महाराष्ट्राबाबतची ही उदासीनता नजरेत भरणारी होती. यामुळे अमित शाह व फडणवीस यांच्यातील दरीबाबतही बरीच चर्चा झाली. कारण काही का असेना; पण संपूर्ण देश भाजपच्या मुठ्ठीत आणण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणार्‍या अमित शाह यांनी महाराष्ट्र ’ऑप्शन’ला टाकला होता एवढे नक्की. मात्र गेल्या तीन महिन्यात चित्र बदलले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यात, घालवण्यात राज्यातील मंडळी अयशस्वी झाल्यानंतर अमित शाह यांनी सगळी सूत्रे आपल्याकडे घेतली. एकनाथ शिंदे यांचे बंडही फडणवीसांची नव्हे, तर अमित शाह यांची कलाकारी असल्याचे सांगितले जाते. सर्व पूर्वतयारी केल्यानंतर त्यांनी फडणवीस यांच्याकडे अंमलबजावणी करण्याचे काम सोपवले व त्यावरही स्वतः लक्ष ठेवून होते, असे म्हणतात.

सत्तांतरानंतर अमित शाह महाराष्ट्राबाबत अधिक सक्रिय झाल्याचे दिसते आहे. मागच्या आठवड्यात त्यांनी मुंबईचा दौरा करून महापालिका निवडणुकीचा बिगुल फुंकला. शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडून त्यांना राज्याच्या सत्तेतून बेदखल केल्यानंतर आता मुंबईलाही शिवसेनामुक्त करण्याचा इरादा शाह यांनी व्यक्त केला आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील आम आदमी पक्षाची सत्ता, व देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या महापालिकेवरील शिवसेनेचे वर्चस्व भाजपला सतत डाचते आहे. दोन्ही ठिकाणी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना विकलांग झाली असली तरी अजून संपलेली नाही. मुंबई महापालिकेची सत्ता आहे तोवर ती संपणारही नाही. आणि याचीच जाणीव असल्याने मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप यावेळी सगळी शक्ती पणाला लावणार हे उघड आहे. या मोहिमेचे सूत्रसंचालनही स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह करणार याचे संकेतही त्यांनी स्वतः परवाच्या मुंबई दौर्‍यात दिले आहेत.

अमित शाह यांनी आपल्या मुंबई दौर्‍यात उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी युती करताना स्वतः अमित शाह यांनी स्व. शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाबाबत शब्द दिला होता व नंतर शब्द फिरवल्याने महाविकास आघाडीचा प्रयोग करावा लागल्याचा दावा उद्धव ठाकरे गेली अडीच वर्षे सातत्याने करत आले आहेत. अमित शाह यांनी याचा इन्कार केला होता; पण परवाच्या मुंबई दौर्‍यात त्यांनी प्रथमच याबाबत तपशीलवार स्पष्टीकरण केले. उद्धव ठाकरे यांना आपण कधीही मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन दिले नव्हते. उलट त्यांनी मागणी केली तेव्हाच ठाम नकार दिला होता. उद्धव ठाकरे यांनी पाठीत खंजीर खुपसला. राजकारणात सर्व सहन करा; पण विश्वासघात सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत जिद्दीने मैदानात उतरा व शिवसेनेला त्यांची जागा दाखवा, असे आवाहन अमित शाह यांनी भाजप पदाधिकार्‍यांच्या बैठकीत बोलताना केले.

एखाद्याला थप्पड मारली तर त्याला त्रास होतो; पण त्याच्या घरासमोर थप्पड मारली तर अधिक त्रास होतो, असे सांगत मुंबईत शिवसेनेला धडा शिकवण्याचा निर्धार शाह यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रावर वर्चस्व मिळवायचे असेल, तर मुंबईवर वर्चस्व मिळवावे लागेल आणि मुंबई महापालिका जिंकण्यासाठी आता सर्वात चांगली संधी असल्याचे सांगत, शाह यांनी ’मिशन-150’ चा नारा दिला. शाह यांची भाषा आगामी निवडणुकीत भाजप किती आक्रमकपणे रिंगणात उतरणार आहे याची चुणूकच होती. त्याच वेळी शिवसेनेवर विश्वासघाताचा आरोप करताना 2022 मधील सत्तांतर ही 2019 मध्ये शिवसेनेने केलेल्या राजकारणाची परिणीती असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. शिवसेनेच्या आजच्या स्थितीला भाजप नव्हे, तर ते स्वत:च जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. राजकीय उलथापालथीमुळे घायाळ झालेल्या उद्धव ठाकरे यांना मुंबईकर मराठी मतदारांची सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे व उद्धव ठाकरे यांची सगळी मदार यावर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे राहून भाजपने केलेल्या राजकारणाविरोधात जनमत तयार होऊ नये याची काळजी घेण्यासाठी अमित शाह यांनी शिवसेनेनेच विश्वासघात केल्याच्या प्रचारावर भर देण्याचा कानमंत्र स्थानिक पदाधिकार्‍यांना दिला आहे. एकूण ही निवडणूक अतिशय रंगतदार होणार याची चुणूक परवा दिसली.

शिवसेनाही सज्ज!

अमित शाह यांनी शिवसेनेला ’जमीन’ दाखवण्याचा निर्धार मुंबई दौर्‍यात व्यक्त केला. तर याला प्रत्त्युत्तर देताना शिवसेनेने त्यांना ’आस्मान’ दाखवण्याचा इरादा जाहीर केला आहे. पैसा व सत्तेच्या बळावर शिवसेनेची काही माणसे त्यांनी विकत घेतली; पण जनमत कसे विकत घेणार? असा सवाल करताना, भाजपचे मिशन हा मुंबईविरुद्ध मोठा कट असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. आदिलशाह, कुतुबशाह यांच्या यादीत अमित शाह यांना बसवून महापालिका निवडणुकीला महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या लढाईचे स्वरूप देण्याचा इरादा शिवसेनेने व्यक्त केला आहे. 2012 मध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही ’महापालिका निवडणुकीनंतर मुंबईत ठाकरे नाव दिसणार नाही’, या त्याच्या वक्तव्याचा शिवसेनेने जोरात लाभ घेतला. 2014 मध्ये युती तोडून शतप्रतिशत सत्तेसाठी मैदानात उतरलेल्या भाजपला अफझलखानाच्या फौजांची उपमा देत शिवसेनेने जोरदार टक्कर दिली. भाजपचा अश्वमेध 122 वर रोखून पुन्हा युती करायला भाग पाडले. ही सगळी उदाहरणे पाहिली, तर संकटाच्या काळात शिवसेना अधिक इर्षेने लढून यश मिळवताना दिसली. यावेळची स्थिती व आव्हान अधिक गंभीर असल्याने शिवसेनेला यश मिळणार की नाही? हे येणारा काळच सांगू शकेल.

याकूबच्या कबरीचा वाद!

1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील गुन्हेगार याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण केल्याचे समोर आल्यानंतर मोठा वाद ऊफाळला. भाजप आणि विरोधकांमध्ये यावरून आरोपांच्या फैरी सध्या सुरू आहे. वस्तुतः कबरस्थानमधील दफनविधी व तेथील कबरी हा वक्फ बोर्डाच्या अखत्यारीतील विषय आहे. त्यावर महापालिका अथवा राज्य सरकारचे कुठलेही थेट नियंत्रण नाही. परंतु मुंबईचा गुन्हेगार असलेल्या याकूबच्या कबरीचे सुशोभीकरणावरून भाजपने उद्धव ठाकरे व शिवसेनेला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. सत्तेसाठी शिवसेनेने केवळ हिंदुत्वच सोडले नाही, तर देशद्रोह्यांचे उदात्तीकरण करायलाही मुभा दिल्याचा आरोप भाजपने चालवला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी केली. तर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ‘पेंग्विन सेने’च्या अध्यक्षांनी ‘कबर बचाव अभियान’ चालू करावे असा टोला लगावला. पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण कोणी केले? त्यासाठी कोणी परवानगी दिली? याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. राजकारणात बेफाम आरोप-प्रत्यारोप नवीन नाहीत. सध्याचे वातावरण तर त्यासाठी खूपच पोषक असल्याने त्याला कोणत्याही मर्यादा राहिलेल्या नाहीत; पण काही वेळा अतिघाईमुळे तोंडघशी पडावे लागते.

भाजपच्या काही लोकांनी याकूब मेमनचा भाऊ रौफ मेमनचा मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सोबतचा फोटो प्रसिद्ध करून शिवसेनेला आणखी कात्रीत पकडायचा प्रयत्न केला. तेव्हा स्वतः किशोरी पेडणेकर व काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी याच रौफ मेमनचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबरोबरचे फोटो प्रसिद्ध करून आरोप करणारांना तोंडघशी पाडले. अमेरिकेने पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक करून ओसामा बिन लादेनला मारले व त्याच्या मृतदेहाचे समुद्रातच अज्ञात ठिकाणी दफन केले. अफझल गुरू व मुंबईवर हल्ला करणार्‍या कसाबला फाशी दिल्यानंतरही त्याच्या मृतदेहाचे सन्मानाने, पण अज्ञात स्थळी दफन करण्यात आले. मग याकूब मेमनचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात का दिला? असा सवाल करत याबद्दल भाजपनेच जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही शिवसेनेने केली. कायदे मंडळाच्या सदस्यांना कायदे, नियम, जेल संहिता याबाबतची माहिती नाही असे तरी कसे म्हणणार? पण आरोप-प्रत्यारोपांची धुळवड सुरू झाल्यानंतर सारासार विचाराची अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे. राजकारणातल्या ’न्यू नॉर्मल’मध्ये हे अटळ आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा