स्मार्ट सिटी होताना : सुरेश कोडीतकर

पुणे शहराची स्मार्ट सिटी होण्याची शक्यता आपण तपासत आहोत. अनेक विषयांचे आपण क्रमशः विश्लेषण करणार आहोत. तथापि उपरोक्त विषय तातडीने घेण्याचे कारण म्हणजे आपल्या स्मार्ट सिटी होण्याच्या दाव्याची पावसाने उडवलेली खिल्ली. नेमिची येतो पावसाळा हे आपण जाणतो. त्यासाठी छत्री, रेनकोट याची व्यवस्था करतो; पण पुण्यात या तजवीजचा फार उपयोग होत नाही. स्मार्ट सिटी होऊ पाहणारे पुणे, वाहतूक आणि परिवहन व्यवस्थेत शून्य आहे, हे आपण जाणतो; पण पावसाळ्यात फक्त व्यवस्थाच उघड्या पडतात, असे नव्हे तर शासन आणि प्रशासनाच्या दाव्याची पोलखोल होते. पावसाळ्यात जनतेच्या हालाला पारावार राहत नाही. कारण पावसाने रस्त्यांवर नदी होऊन वाहणारे पावसाचे पाणी, रस्त्यांची झालेली चाळण, जागोजागी होणारी वाहतूक कोंडी, मुंगीच्या गतीने सरकणारी गर्दी, यामुळे वाया जाणारे लाखो मनुष्यतास, होणारे भीषण प्रदूषण, वाहन चालवणार्‍या लोकांना होणारे पाठीचे, मणक्याचे आजार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वाहनाच्या कोंडीत वाया जाणारे अमूल्य इंधन आणि परकीय चलन. स्मार्ट सिटीत कामावर जाताना किंवा घरी परतताना जर खूप वेळ रस्त्यांवर अडकून पावसात भिजत थांबावे लागत असेल, तर मग, जनता प्रशासनाला मनातल्या मनात दुवा देत असेल काय?

ना रस्ते ना गटार

पाऊस हा पुणे शहर स्मार्ट सिटी करण्याची स्वप्ने या बाता आणि वल्गना आहेत हे दाखवून देत आहे. महापालिका हद्दीतील नागरी विकासाची कामे पाहायला स्वतंत्र तांत्रिक विभाग असतात. ते म्हणजे पाणी पुरवठा, मलःनिस्सारण, भवन निर्माण, गलिच्छ वस्ती निर्मूलन, आणि पथ. महापालिका हद्दीत चांगले रस्ते असावेत, त्यांची वेळेवर डागडुजी व्हावी, पावसाच्या पाण्याचा निचरा होईल अशा गटारांची व्यवस्था असावी ही अपेक्षा रास्त म्हणायला हवी; पण ही अपेक्षा पूर्ण होत नाही. रस्त्यांची अवस्था सुधारत नाही. पुण्यात काही वर्षांपूर्वी चांगल्या अवस्थेत असलेले डांबरी रस्ते उखडून एक ते दीड फूट जाडीचे काँक्रिटचे रस्ते केले गेले; पण ना पावसाच्या पाण्याचा निचरा झाला ना वाहतूक जलद गतीने मार्गस्थ होऊ शकली. पुणे शहर लोकसंख्या आणि वाहन संख्येत निरंतर वाढ नोंदवत असताना शहराच्या जीवन वाहिन्या असलेल्या व्यवस्था कुचकामी असतील, तर मग स्मार्ट सिटी घडवण्याच्या स्वप्नांपासून आपण लांब राहिलेले बरे. परिवहन सेवा आणि रस्त्यांची दुर्दशा यामुळे शहरात वाहनांची अफाट संख्या वाढून पर्यावरण आणि प्रवास सुगमता नष्ट झाली आहे. हे ज्ञात असूनही त्यावर तोडगा काढला जात नाही. या निर्ढावलेपणातून पुणे स्मार्ट सिटी कसे होणार? साडेतीन दशकापासून फक्त चर्चेतच असलेला रिंगरोड मूर्त रूप घेत नाही, हा विलंब सिटी स्मार्टचे दिवास्वप्न पाहणार्‍यांना खिजवत आहे.

रस्त्यांमुळे वेगवान विकास

रस्ते मग ते खेड्यातील मुरूम आणि मातीचा भराव अंथरून पाणी फवारून केलेले असो वा डांबरी सडक असो. प्रमुख जिल्हा मार्ग असो वा राज्य मार्ग असो. राष्ट्रीय महामार्ग असो वा शहरातील रस्ते. माणसांचा वेगवान प्रवास आणि माल वाहतूक यासाठी रस्त्यांचे मोल मोठे आहे. अनेक प्रगत राष्ट्रांनी त्यांच्या विकासाचे श्रेय रस्त्यांच्या लांबलचक जाळ्यांना दिले आहे. महानगरीचे मुंबईचे कौतुक याचसाठी होते की तिथे लोकल रेल्वेचे कर्जत, कसारा आणि वसई, विरार, नालासोपारा आणि अगदी पनवेलपर्यंत व्यापक असे लोहमार्ग आहेत. शिवाय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील महापालिकांची स्वतंत्र परिवहन सेवा दिमतीला आहे. त्यामुळे नागरिकांसाठी दळणवळणाच्या चांगल्या सोयी उपलब्ध झाल्या आहेत. शिवाय उड्डाणपूल, बायपास, समतल विलगक, यामुळे प्रवासी आणि माल वाहतूक सोपी झाली आहे. मुंबई आणि परिसरात टॅक्सी, रिक्षा सेवा आधीपासून आहेत. मेट्रो सेवा पूर्ण क्षमतेने सुरु व्हायची आहे. या सर्वांमुळे वाहतुकीचा वेग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगराचा विचार करता केवळ निराशा हाती येते. स्मार्ट सिटीत आपण सुलभ, वेगवान, पर्यावरणपूरक परिवहन व्यवस्था उभी करण्याला प्राधान्य देत आहोत. मग पुण्यात पावसाने केलेली दुरवस्था पाहून अशी व्यवस्था उभारणे शक्य आहे, की नाही याचे उत्तर शोधायचे आहे.

अपुरे रस्ते आणि वाहनकोंडी

स्मार्ट सिटीत फक्त उत्तमोत्तम इमारती उभारणे अपेक्षित नव्हे. पुण्यात राहण्यासाठी सुसज्ज आणि साधारण अशा श्रेणीतील अनेक चांगल्या गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत. शासकीय किंवा खासगी कार्यालयात काम करण्यासाठीसुद्धा पुण्यात नव्या आणि जुन्या चांगल्या इमारती आहेत. मनोरंजनासाठी अनेक चांगली सिनेमागृह आणि नाट्यगृह आहेत; पण शहरात वाहतुकीला आणि पर्यटन स्थळांवर जायला चांगले आणि कोंडीमुक्त रस्ते आहेत कुठे? लोकांकडे दुचाकी आणि चार चाकी वाहने आहेत. पण जर रस्त्यांवर वाहन चालवायला जागाच नसेल तर? वाहने लावायला जागाच शिल्लक नसेल तर? पावसाळ्यात या समस्येत अधिक भर पडते. स्मार्ट सिटीत अशी गैरसोय अपेक्षित आहे काय? वाहन जाग्यावर थांबून आहे. सर्वत्र धूर भरून राहिला आहे. लोक सार्वजनिक बसमध्ये, स्वतःच्या वाहनात, दुचाकीवर बसून कोंडी फुटण्याची आणि रस्ते मोकळे होण्याची वाट पाहून कंटाळले आहेत. स्मार्ट सिटीत लोकांचा मनःस्ताप अपेक्षित आहे काय? आता तर शहरातच नव्हे, तर पुण्याच्या दशदिशांना ग्रामीण भागातही वाहतूक कोंडीचा सर्वांना सामना करावा लागत आहे. मग तो चांदणी चौक असो खडकवासला चौपाटी आणि सिंहगड.

वाहतूक व्यवस्थापनाचा अभाव

सार्वजनिक दळणवळणाच्या सोयींच्या मर्यादा आणि आक्रसलेले रस्ते, संकोचलेले पदपथ यांना जर मोकळा श्वास घेता आला, तर स्मार्ट सिटी आकार घेऊ शकेल. दुर्दैवाने शासन आणि प्रशासन हे काम अनेक वर्षे करू शकलेले नाहीत. रस्त्यांचे क्षेत्रफळ वाढवणे, पर्यायी उन्नत मार्ग, भुयारी मार्ग तयार करणे, जड वाहतूक बाह्य वळण मार्गाने वळवणे हे सर्व जर केले, तर स्मार्ट सिटीत अपेक्षित असे वेगवान दळणवळण शक्य होऊ शकेल. वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट ही मेट्रो सेवा अजून चालू व्हायची आहे. स्मार्ट सिटीत अनेक मेट्रो मार्ग अत्यंत तीव्रतेने अपेक्षित आहेत. पुण्यात वाहतूक व्यवस्था आणि रस्ते हा गंभीर प्रश्न आहे. त्याचे उत्तर कोणाकडेच नाही. त्यामुळे उन्नत मार्ग अर्थात मेट्रोकडून पुणेकरांना भरगच्च अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. जर गावठाणातून दूरवरच्या ग्रामीण भागात अथवा तालुक्यातून शहरात यायला, पुण्याच्या चहूकडून माहिती तंत्रज्ञान उपनगरात पोहचायला जर मेट्रोची सोय झाली, तर अनेक दुचाकी, चारचाकी रस्त्यावर येणार नाहीत. बसची संख्याही कमी होईल. स्मार्ट सिटी म्हणजे गर्दीमुक्त रस्ते, वेळ आणि इंधनाची बचत हे अपेक्षित आहे. हे शक्य होईल का?

सुधारणांना विलंबाचे दुष्परिणाम

आपण पुणे शहराभोवती द्रुतगती मार्ग, रिंग रोड याचे कागदावर नियोजन करण्यात मग्न आहोत. मेट्रोचे जाळे साकार व्हायला अजून अवकाश आहे. पुणे-नाशिक लोहमार्गाचे भूसंपादन करण्यात येत आहे. अजून प्रत्यक्ष काम सुरु होऊन रेल्वे धावायला किमान दोन वर्षे लागतील. पुणे लोणावळा लोकल मार्गाची स्वतंत्र मार्गिका नुसतीच चर्चेत आहे. ना दोन्ही महापालिका, ना जिल्हा परिषद, ना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यात पुढाकार वा रस घेत आहेत. रस्त्यांना क्षेत्रफळ वाढीसाठी पुरेसा वाव नसणे, उपलब्ध रस्त्यांच्या कार्यान्वयनाचे आणि वाहतुकीचे नियोजन नापास होणे आणि भरीस भर म्हणून रस्त्यांची, कसेबसे टिकून असलेल्या पदपथांची दुरवस्था असणे आणि आपण स्वप्न पाहतोय पुणे महानगर स्मार्ट होण्याचे. पावसाने आपल्या रस्त्यांची कल्हई आणि पॉलिश उडवून कामाचे पितळ उघडे पाडले आहे. स्मार्ट सिटी होण्याचे स्वप्न दूर लोटले आहे. लोक आपला वेळ, आरोग्य गमावून आणि आपली हाडे झिजवून, पाठीचा मणका दुखवून प्रवास करतात. मनः शांती गमावतात. कुटुंबाला द्यायचा वेळ ते वाहतूक कोंडीत वाया घालवतात. हे आजच्या पुण्याच्या जन आरोग्याचे कटू वास्तव आहे.

इंधन, डॉलरची बरबादी

वाहतूक कोंडीचा सगळ्यात मोठा तोटा हा आहे की आपण वेळ, स्वास्थ्य, विश्रांती वगैरे गमावतोच; पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे अमुल्य लाखो लिटर इंधन वाया जाते. या इंधनासाठी आपण लाखो डॉलर परकीय चलन खर्च करत आहोत. वाहतूक कोंडी वाहने जाग्यावर थांबवून, वेग मंदावून इंधन वाया घालवते. अनावश्यकपणे इंधन, डॉलर, आरोग्य खर्ची घालून प्रदूषण वाढवणे हे आपल्याला स्मार्ट सिटीच्या वाटेवर कसे घेऊन जाणार?

दूरदृष्टीचा अभाव

पुणे शहराच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागात महानगर म्हणून होत असलेला विस्तार हा सुधारणांसाठी कालावधी द्यायला असमर्थ ठरत आहे. ज्या सुधारणा प्रत्यक्षात येत आहेत, त्यांची उपयोगिता कमी ठरणार आहे. याचे कारण म्हणजे सुधारणा योग्यवेळी न होता विलंबाने होत असल्याने त्याची अत्यावश्यकता कमी होणे आणि भूमितीय पद्धतीने लोकसंख्या वाढल्याने अचूक लोकसंख्येचे मापन चुकणे. या सर्वांच्या परिणामी स्मार्ट शहर होणे हे दूरचे स्वप्न ठरत आहे. शासन आणि प्रशासनाला भविष्याचे आकलन, नियोजन नसणे आणि जनतेकडे दूरदृष्टीचा विचार आणि रेटा नसणे, हे शहरे स्मार्ट न होण्याचे यापुढे प्रमुख कारण ठरणार आहे. आज मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग अपुरा ठरत आहे. सुट्टीच्या दिवशी प्रचंड वाहतूक कोंडीचा लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. पुण्याहून सातारा दिशेने जायला आणि यायलासुध्दा वाहतूक कोंडी पिच्छा सोडत नाही. अशी परिस्थिती सर्व दिशांना आहे. पाऊस हा कोंडी आणि समस्या, मनःस्ताप यात भर घालतो.

जमिनीवरील कटू वास्तव

आज पुणे शहर अथवा विस्तारित पुणे स्मार्ट होण्याचा पुकारा आपण करतो; पण जमिनीवरील वास्तव काही वेगळेच आहे. पुणे महापालिकेने शहर सुधारणा करताना ज्या चुका केल्या अथवा वेळ निघून गेल्यावर जी कामे केली नेमके त्यातून धडा घेत पिंपरी चिंचवड महापालिकेने कामे केली. तसेच वेळ निघून जाऊ न देण्याची यथोचित काळजी घेतली. त्यामुळे त्यांच्या स्मार्ट सिटी होण्याला स्त्रोतांचे पुरेसे पाठबळ उपलब्ध आहे. तसे पुणे शहराचे नाही. आता एकत्रित पुणे हे महानगर म्हणून विचार करताना त्याचा स्मार्ट होण्याचा एकात्मिक विचार करावा लागणार आहे. ते करत असताना निसर्ग चक्रातील एक प्रमुख ऋतू असलेला पावसाळा विसरून कसे चालेल? त्याचा विचार आमच्या पुढारी आणि नियोजनकर्त्यांनी ना रस्ते बांधताना केला ना त्यांना पावसाळी गटारे बांधायचे जमले? आज नियोजनाची दुर्दशा झाली आहे. आज सिटी स्मार्ट करायच्या अनेक कल्पना आहेत; पण त्या जमिनीवर रुपांतरीत करायला अनुकूल परिस्थिती नाही. कारण स्मार्ट व्हायच्याऐवजी पुणे शहर फुगले आणि सुजले आहे. जमिनीवरील व्यवस्था कुजल्या, सडल्या आहेत. त्या बळकट करण्या आणि सुधारणा करण्यापलिकडे गेल्या आहेत. वास्तव कटू आहे. स्मार्ट पुण्याचा समग्र विचार करताना वास्तव टाळून चालणार नाही, हे पाऊस प्रकर्षाने दाखवून देत आहे.

पुणे शहराचा वैभवशाली गणेशोत्सव दिमाखात साजरा झाला. गेले दोन वर्षे तो जोशात साजरा करता आला नव्हता; पण यंदा मात्र उत्साह ओसंडून वाहत होता. या पार्श्वभूमीवर पुणे शहर, रस्ते, खड्डे, प्रचंड वाहने आणि अवाढव्य गर्दी, पार्किंगची समस्या आणि हे सर्व नियंत्रणाबाहेर जाण्याची बाब चर्चेत आली आहे. लोकांना आता या समस्यांवर उपाय हवा आहे; पण शहर स्मार्ट होताना लोकांनीही सहभाग आणि सहकार्य अपेक्षित आहे. शहर, पाऊस, रस्ते, वाहने आणि त्यांचे कठीण आवागमन यावर ठाम उपाययोजना राबविणे आता अनिवार्य झाले आहे. समस्येने जटील आणि आक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. पुणेकरांनी आणि प्रशासनाने वेळीच जागे झालेले बरे!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा