पुणे : पालखीतील ‘श्रीं’च्या दर्शनासाठी भक्तांचे आतुरलेले डोळे, गणरायाच्या आगमनाचा सांगावा घेऊन येणारा सनई-चौघड्याचा मंगलमय सूर, चौकाचौकांत स्वागत करणार्‍या रांगोळ्या, गर्दीत हरवलेला रस्ता, ढोल-ताशावर ठेका धरणारी तरूणाई, भक्तांचा ओसंडून वाहणारा उत्साह, फुलांनी सजविलेल्या पालखीतील ‘बाप्पा’ दृष्टिपथात पडताच मनोभावे हात जोडणारे आबालवृद्ध, मुखातून आपसूक बाहेर पडलेला ‘गणपत्ती बाप्पा मोरया’ चा जयघोष आणि गणरायाची छबी मोबाइलमध्ये टिपण्यासाठी उंचावलेले हात… अशा उत्साही, आनंददायी व मांगल्यमय वातावरणात मानाचा पाचवा ‘केसरी गणेशोत्सवा’च्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीने शुक्रवारी गणेशभक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
केसरी गणेशोत्सवाची ऐतिहासिक, समाजप्रबोधक आणि संस्कृतीचे दर्शन घडणारी ‘श्रीं’ची मिरवणूक पाहण्यासाठी महात्मा फुले मंडईतील टिळक पुतळ्यापासून ते संपूर्ण लक्ष्मी रस्त्यावर दुतर्फा भक्तांची अलोट गर्दी झाली होती. या रस्त्यावरून निघालेली ही मिरवणूक सर्व गणेशभक्तांचे आकर्षण ठरली. परंपरेनुसार पालखीत विराजमान झालेल्या ‘श्रीं’चे लोभस रूप डोळ्यात साठविण्यासाठी भक्तांच्या चेहर्‍यांवर आतुरता जाणवत होती. आबालवृद्धांसह सर्वांनाच दर्शनाची ओढ लागली होती. केसरी गणेशोत्सवाच्या मिरवणुकीला महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून दुपारी 3 वाजता सुरुवात झाली. पारंपरिक पालखीमध्ये गणराय विराजमान झाले होते. मिरवणुकीसाठी खास आकर्षक फुलांची सजावट केलेला मेघडंबरी रथ तयार करण्यात आला होता. हा आकर्षक रथ मोबाइलमध्ये टिपण्यासाठी तरूणाईनी गर्दी केली. ऐतिहासिक परंपरा असलेल्या केसरी गणेशोत्सवाची मिरवणूक ही आपले वेगळेपण प्रतिबिंबित करीत होती. रांगोळीच्या पायघड्यांमुळे विसर्जन मिरवणुकीच्या उत्साहात भरच पडली.
मंडईतील टिळक पुतळ्याजवळ मिरवणूक आल्यानंतर गणेशभक्तांची दर्शनासाठी रीघ लागली होती. मिरवणुकीच्या सुरुवातीला बिडवे बंधूचा सनईचौघडा होता. केसरी गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये शिवमुद्रा, वज्र आणि श्रीराम ही ढोलताशा पथके होती या ढोल-ताशा पथकांच्या ठेक्यावर तरूणाईने सुरूवातीपासूनच ताल धरला होता.
केशव शंखनाद पथकानेही शंखांच्या मधुर स्वरांनी भक्तांचे लक्ष वेधून घेतले. केसरी गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक 4.30 च्या सुमारास बेलबाग चौकामध्ये दाखल झाली. यावेळी ‘श्रीं’चे दर्शन घेण्यासाठी आणि गणरायाची मुद्रा आपल्या कॅमेर्‍यात टिपण्यासाठी शेकडो हात वर झाले. श्रीराम, वज्र आणि शिवमुद्रा या पथकांनी बेलबाग चौकामध्ये केलेल्या ढोल-ताशा वादनाने सर्वजण मंत्रमुग्ध झाले. श्रीराम पथकाच्या ‘जय श्रीराम’च्या या जयघोषाने संपूर्ण परिसरच दुमदुमला. विसर्जन मिरवणुकीमध्ये ‘केसरी’चे विश्वस्त सरव्यवस्थापक डॉ. रोहित टिळक, विश्वस्त डॉ. प्रणति रोहित टिळक, कुणाल शैलेश टिळक, केसरीचे अधिकारी-कर्मचारी यांच्यासह विविध क्षेत्रांतील व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.रात्री 8.30 वाजता ‘श्रीं’चे टिळक चौकामध्ये दाखल आगमन होताच ढोल पथकांच्या वादनाने गणेशभक्तांचा जल्लोष द्विगुणित झाला. अनेकांनी ढोल ताशाच्या वादनासोबत हात उंचावत ताल धरला. महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षात डॉ. रोहित टिळक यांचा सन्मान करण्यात आला. यानंतर गणरायाची विसर्जन मिरवणूक पांचाळेश्वर घाटाच्या दिशेने रवाना झाली. याठिकाणी ‘श्रीं’ची आरती झाल्यानंतर डॉ. रोहित टिळक व डॉ. प्रणति टिळक यांच्या हस्ते रात्री 8.50 वाजता हौदामध्ये ‘श्रीं’चे विसर्जन करण्यात आले. हौदामध्ये गणपती विसर्जनाची परंपरा केसरीने कायम ठेवली.
भक्तांना भुरळ
मानाचा पाचवा केसरी गणेशोत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे. या गणपतीच्या वैभवशाली मिरवणूक परंपरेतून संस्कृतीचे दर्शन भक्तांना घडत असते. प्रथेप्रमाणे खास आकर्षक फुलांची सजावट केलेल्या पालखीत ‘श्रीं’ची लोभस मूर्ती विराजमान झाली होती. या मूर्तीची भक्तांना भुरळ पडत होती. ‘श्रीं’चे रूप डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी लक्ष्मी रस्त्यावरील भक्त आतुर झाले होते.
‘शंखनादला’ पुणेकरांचा प्रतिसाद
महात्मा फुले मंडईतील टिळक पुतळ्याजवळ केसरी गणेशोत्सवाची मिरवणूक असताना केशव शंखनाद पथकाने मिरवणुकीत सहभागी होऊन शंखांच्या मधूर स्वराने गणेशभक्तांची मने जिंकली. त्यास टाळ्या वाजवून उपस्थितांनी प्रतिसाद दिला. त्यानंतर मिरवणूक शगुन चौकात आल्यानंतर पुन्हा हे शंखपथक मिरवणुकीत सहभागी झाले. पथकाने वेगवेगळ्या पद्धतीने शंखवादन करून गणेशभक्तांना आनंद दिला. यावेळीही लक्ष्मी रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या भक्तांनी प्रचंड टाळ्या वाजवून या पथकांचे स्वागत केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा