पुणे : कवयित्री शांताबाई यांनी रचलेली भावगीते, भक्तिगीते, गवळणी, लावण्या आणि कोळी गीते अशा एकाहून एक अर्थपूर्ण व भावपूर्ण रचना कलाकारांनी सादर करून श्रोत्यांची गुरूवारची सायंकाळ रममाण केली. निमित्त होते केसरी गणेशोत्सवाचे.

केसरी गणेशोत्सवात गुरूवारी गोल्डन मेमरीज प्रस्तुत ‘आठवणीतल्या शांताबाई’ हा मराठी गीतांचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची निर्मिती संकल्पना चैत्राली अभ्यंकर यांची होती. तर, संजीव मेहेंदळे व संगीता पुराणिक यांचा सहभाग होता.

केसरी गणेशोत्सवात गुरूवारी गोल्डन मेमरीज प्रस्तुत ‘आठवणीतल्या शांताबाई’ हा मराठी गीतांचा कार्यक्रम पार पडला.

जय शारदे वागीश्‍वरी ही प्रार्थना चैत्राली अभ्यंकर यांनी सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. शांताबाईंची भाषाशैली, काव्यशैली, गर्भित अर्थ, शब्दकौशल्य, तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर व सुधीर फडके यांच्याशी झालेला संवाद, गमंती-जमती यावेळी उलगडून सांगितल्या. ‘गणराज रंगी नाचतो’, ‘गजानन श्री गणराया, आधी वंदु’ सारख्या गणपतींच्या गाण्यांनी, तसेच ‘वल्लव रे नखवा’ या कोळी गीते सादर करून श्रोत्यांना मनमुराद आनंद दिला.

शांताबाई शेळके यांच्या अजरामर साहित्य, गीतरचना आणि काव्याच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकला. गीत आणि निवेदनाच्या माध्यमातून त्यांच्या लेखनीचे विविध पैलू उलगडून दाखविले. भक्तिगीते, लावणी, बालगीते, लोकगीते, नाट्यगीते, गवळणी, प्रेमगीते असे अनेक भावगीतातील त्यांचे काव्य, रचना कौशल्य सर्व कलाकारांनी उलगडून दाखविले. एकापेक्षा एक सुंदर गीते चैत्राली अभ्यंकर, संजीव मेहेंदळे व संगीता पुराणिक यांनी सादर केली. त्यांच्या या सुरेल गायकीला उपस्थित रसिक, श्रोत्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा