दिल्लीतील राजपथचे कर्तव्यपथ असे नामांतर करण्यात येणार आहे. ज्या मार्गावर दरवर्षी 26 जानेवारीला भारतीय संस्कृती आणि शक्तीचे दर्शन होते, त्या रस्त्याला आता राजपथ ऐवजी कर्तव्यपथ असे नाव देण्यात येणार आहे. भारतीय इतिहासातील महत्त्वाचा भाग असलेल्या राजपथाचे नाव बदलण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही त्याचे नामकरण झाले आहे. याशिवाय या मार्गाची खूप ऐतिहासिक पार्श्‍वभूमी राहिली असून, या मार्गाच्या अनेक कथा इतिहासाच्या पानात नोंदल्या आहेत.

१०२ वर्षांत तिसर्‍यांदा नामांतर

गेल्या 102 वर्षांत राजपथचे नाव तिसर्‍यांदा बदलण्यात येत आहे. ब्रिटिश राजवटीत या रस्त्याचे नाव किंग्सवे होते. स्वातंत्र्यानंतर त्याचे नाव बदलून ’राजपथ’ ठेवण्यात आले, जो किंग्जवेचा हिंदी अनुवाद आहे. आता त्याचे नाव बदलून कर्तव्यपथ असे करण्यात येत आहे.

राजपथाचा इतिहास

राजपथ ब्रिटिशांच्या काळात बांधण्यात आला होता. राजपथची रचना ब्रिटिश वास्तुविशारद सर एडविन लुटियन्स यांनी केली होती. इंडिया गेट ते राष्ट्रपती भवनाकडे जाणार्‍या या रस्त्याच्या दोन्ही बाजूला बागा आहेत. तेव्हा राष्ट्रपती भवनातून नवीन शहराचे दर्शन घडविण्यासाठी ते बांधण्यात आले होते, जे त्यावेळी व्हाईसरॉयचे निवास्थान होते. स्वातंत्र्यानंतर याला राष्ट्रपती भवन म्हटले जाऊ लागले. राजपथला पूर्वी किंग्स वे असे संबोधले जात होते, कारण त्याचे नाव जॉर्ज पंचमच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले होते. जॉर्ज पंचम यांनी ब्रिटिश भारताची राजधानी कोलकाताहून दिल्लीला हलवली. त्या वेळेस हा राजाचा मार्ग होता. 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर किंग्ज वेचे नाव बदलून राजपथ करण्यात आले.

राजपथचे महत्त्व

राजपथ हे भारताच्या अभिमानाचे प्रतीक आहे. हा रस्ता नवी दिल्लीच्या लुटियन्स झोनमधील इंडिया गेटमार्गे राष्ट्रपती भवनापासून नॅशनल स्टेडियमपर्यंत जातो. संसद भवन ते नॉर्थ आणि साउथ ब्लॉक या मार्गावर आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त काढण्यात येणारी परेडही याच रस्त्यावर होते. दिल्लीचा राजपथ अनेक अर्थाने खास आहे. आता केंद्र सरकार या रस्त्याचे नाव बदलून ‘कर्तव्यपथ’ करणार आहे. यानंतर इंडिया गेट येथील नेताजींच्या पुतळ्यापासून राष्ट्रपती भवनापर्यंतचा संपूर्ण मार्ग आणि परिसर कर्तव्यपथ म्हणून ओळखला जाईल. हा तोच रस्ता आहे जिथे दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य मिरवणुका काढल्या जातात.

प्राध्यापक पर्सिव्हल स्पिअर यांनी दिले किग्जवे नाव

किंग्जवे हे नाव सेंट स्टीफन महाविद्यालयाचे इतिहासाचे प्राध्यापक पर्सिव्हल स्पिअर यांनी दिले होते. वास्तविक, नवी दिल्लीतील सर्व रस्त्यांना ब्रिटिश सरकारने त्यांच्या सल्ल्याने नावे दिले होती.

1924-1940 पासून सेंट स्टीफन कॉलेजमध्य पर्सिव्हल स्पीयर इतिहासाचे प्राध्यापक होते. नवी दिल्ली निर्माण झाल्यावर ब्रिटिश सरकारने त्यांच्या सल्ल्यानुसार येथील रस्त्यांना अकबर रस्ता, पृथ्वीराज रस्ता, शाहजहान रस्ता इ.नावे दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा